विश्वनगर येथे गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करण्याचा संकल्प…

Spread the love

रत्नागिरी- महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघ तथा फेस्कॉमच्या गाव तिथे ज्येष्ठ नागरिक संघ या संकल्पनेनुसार रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ६ व ७ या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विश्वनगर येथे नवीन ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करण्याचा संकल्प गुढीपाडव्याच्या दिवशी करण्यात आला.
            
स्वयंसेतू या स्वयंसेवी संस्थेच्या संचालिका सौ. श्रद्धा कळंबटे आणि सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र समाविचारी मंचाचे युवा अध्यक्ष श्री. निलेश आखाडे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेऊन दिनांक 30 मार्च रोजी विश्वनगर येथील शिवतेज उद्यानातील सभागृहात ज्येष्ठांची सभा घेऊन हा संकल्प जाहीर केला. या बैठकीला परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला, व ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. या ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यक्षेत्र विश्वनगर, आनंदनगर, हिंदू कॉलनी, मारुती मंदिर ते नाचणे रोड, सहकार नगर असे ठेवण्यात येणार असून वयाची 58 वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व क्षेत्रातील स्त्री, पुरुष, ज्येष्ठाना आणि सेवानिवृत्तांना संघाचे सभासदत्व देण्यात येईल. त्यासाठी मोबाईल क्रमांक 9860625740 अथवा 7385530521 वर संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या पहिल्याच संकल्प सभेला कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. मारुती अंबरे उपाध्यक्ष श्री. राजेंद्र कदम, ज्येष्ठ सल्लागार श्री. शामसुंदर सावंत देसाई, प्रसिद्धी प्रमुख श्री. प्रभाकर कासेकर यांनी उपस्थित राहून शासनाच्या ज्येष्ठ नागरिक धोरणाची माहिती दिली. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी उतार वयात खचून न जाता नव्या उमेदीने जीवन जगण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघात सहभागी व्हावे आणि आपल्या अनुभवाचा फायदा समाजाला द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे समाजसेवा अधीक्षक श्री. रेशम जाधव यांनी मरणोत्तर नेत्रदान आणि देहदानाची सुविधा रत्नागिरीच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध असल्याचे सांगितले. या दानामुळे गरजूंना नवजीवन देण्याचे भाग्य मिळू शकते, असे सांगितले. शेवटी श्री. निलेश आखाडे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या आयोजनात श्रीम. प्रज्ञा टाकळे यांनी सहकार्य केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page