आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक , उत्तर प्रदेशच्या ८ वर्षे फक्त बाताच, फडणवीस सरकारनं ३२ दिवसात लावलं मार्गी…

Spread the love

महाराष्ट्र सरकारने आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्याचे आदेश सरकारनं जारी केले आहेत. लवकरच आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे शानदार स्मारक उभारले जाईल.

आग्रा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने आग्र्यात छत्रपतींचे भव्य स्मारक बांधण्याची घोषणा केली होती. यासाठी महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात घोषणेला मान्यता दिली. शुक्रवारी, महाराष्ट्र सरकारने (CHHATRAPATI SHIVAJI MEMORIAL AGRA) आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्यासाठी सरकारी ठराव (GR) जारी केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे. यामुळे आता स्पष्ट झालं की उत्तर प्रदेश सरकार नाही तर महाराष्ट्र सरकार आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधेल. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारनं एवढे दिवस फक्त बाताच मारल्या मात्र फडणवीस सरकारनं घोषणा केल्यानंतर ३२ दिवसात कामाला लागल्याचं सिद्ध केलं अशी चर्चा उत्तर प्रदेशात आहे.

आठ वर्षे उत्तर प्रदेश सरकार फक्त बोलत राहिले…

उत्तर प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना महाराष्ट्र सरकारने आरसा दाखवला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी १९ फेब्रुवारी रोजी आग्रा किल्ल्यावर घोषणा केली आणि १५ दिवसांत अर्थसंकल्पात निधी मंजूर केला आणि ३२ दिवसांत सरकारी आदेश आणि संपूर्ण कृती आराखडा जारी केला. दुसरीकडे, उत्तर प्रदेश सरकार आठ वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने बोलत राहिले. शिवाजी महाराज स्मारक बांधण्याची मूळ कल्पना तत्कालीन राज्यपाल राम नाईक यांची होती.

यूपी सरकारने अशी तयारी केली…

१९ फेब्रुवारी २०२५ रोजी, आग्रा किल्ल्यावर आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती समारंभात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की आग्रा हे ते ठिकाण आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केले होते. आम्ही आग्रा येथील त्या ठिकाणी एक स्मारक बांधू. शिवाजी महाराजांना जिथे नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं ती जमीन महाराष्ट्र सरकार ताब्यात घेणार आहे. त्यावेळी फडणवीस म्हणाले होते की, मी स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी याबद्दल बोलेन. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. या प्रकल्पासाठी आवश्यक निधी महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाकडून उपलब्ध करून दिला जाईल. १२ मार्च रोजी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रधान सचिव (पर्यटन) मुकेश मेश्राम यांच्याकडून आग्र्याच्या मीना कोठी बाजाराची कागदपत्रे आणि सद्यस्थिती अहवाल मागितला होता.

औरंगजेबाच्या कैदेत शिवाजी महाराज येथे राहिले होते…

ज्येष्ठ इतिहासकार राजकिशोर ‘राजे’ सांगतात की, औरंगजेबाच्या आदेशानुसार, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र संभाजी यांना राजा जयसिंग यांनी फिदाई खानच्या हवेली (कोठी मीना बाजार) परिसरात ठेवले होते. डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्राध्यापक सुगम आनंद म्हणतात की, राजा जयसिंह यांचा मुलगा रामसिंह याला सिद्धी फौलाद खान यांच्या देखरेखीखाली त्यांच्या छावणीजवळ नजरकैदेत ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. शिवाजी महाराजांना राम सिंहच्या छावणीजवळ, शहराबाहेरील एका टेकडीवर असलेल्या फिदाई हुसेनच्या हवेलीत ठेवण्यात आलं होतं. ती हवेली कोठी मीना बाजाराजवळ होती. हे ठिकाण अजूनही कटरा सवाई राजा जय सिंह यांच्या नावाने नोंदलेलं आहे. ही कोठी मीना बाजार आहे.

महाराज १०१ दिवस आग्र्यात राहिले :

ज्येष्ठ इतिहासकार राजकिशोर ‘राजे’ सांगतात की औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट १२ मे १६६६ रोजी झाली. औरंगजेब आणि शिवाजी महाराज आग्रा किल्ल्याच्या दिवाण-ए-खासमध्ये भेटले. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच हजार रुपये भेट म्हणून दिले. यासोबतच एक हजार नाणीही भेट देण्यात आली. परंतु, बैठकीदरम्यान, औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना योग्य आदर दिला नाही, त्याचा शिवाजी महाराजांनी निषेध केला. त्यानंतर १६ मे १६६६ रोजी औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना कैद केले.

शिवाजी महाराजांनी त्यांच्या आरोग्यासाठी गरिबांना फळे वाटण्यास सुरुवात केली. १९ ऑगस्ट १६६६ रोजी शिवाजी महाराज त्यांचा मुलगा संभाजी यांच्यासह फळे आणि मिठाईच्या पेटाऱ्यात बसून येथून निघाले. २० ऑगस्ट १६६६ रोजी औरंगजेबाला शिवाजी महाराजांच्या आग्रा सोडण्याची बातमी कळली. १२ सप्टेंबर १६६६ रोजी शिवाजी महाराज राजगडला पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्रा येथील मुक्काम १०१ दिवसांचा होता. यामध्ये त्यांनी ९९ दिवस नजरकैदेत घालवले. काही इतिहासकारांनी शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून सुटल्याची तारीख १३ किंवा १६ ऑगस्ट अशी सांगितली आहे. याबद्दल इतिहासकार राजकिशोर राजे म्हणतात की, जुन्या आणि नवीन तारखांच्या गणनेत काही दिवसांचा फरक आहे. म्हणूनच इतिहासकारांनी वेगवेगळ्या तारखा लिहिल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य सरकारने जारी केलेल्या सरकारी आदेशात असं लिहिलं आहे की महाराष्ट्र सरकार कोठी मीना बाजारची ती इमारत ताब्यात घेईल. जिथे मुघल सम्राट औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना कपटाने आग्र्याला बोलावून नजरकैदेत ठेवले होते. तिथेच एक भव्य स्मारक बांधले जाईल. यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला नोडल एजन्सी बनवण्यात आले आहे. स्मारकात संग्रहालय, प्रकाश आणि ध्वनी प्रदर्शन, माहितीपट प्रदर्शित केले जातील. महाराष्ट्र सरकारचे उपसचिव विजय कृष्णाजी यांच्या हवाल्याने हा सरकारी आदेश जारी करण्यात आला आहे. स्मारक बांधण्यासाठी आणि लाईट अँड साउंड शोसह इतर कामांसाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली इतिहासकारांची एक समिती स्थापन केली जाईल असं स्पष्टपणे लिहिलं आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page