
रत्नागिरी- भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहर अध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रत्नागिरी शहरातील प्रलिंबित असलेल्या प्रश्नांवर चर्चा केली. लवकरात लवकर कामे पूर्ण करण्यास सांगितले.
यामध्ये प्रामुख्याने सुरू झालेल्या शिमगोत्सवानिमित्त रत्नागिरी शहरातील पालखी मार्ग सुस्थितीत असावे,त्यासाठी रस्त्यांची तातडीने करण्यात यावी.तसेच रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या भागातून रत्नागिरीचे श्रद्धास्थान देवभैरीच्या भेटीला पालख्या येत असतात अशावेळी रत्नागिरी शहरातील मार्गावरील पथदिवे व शहरातील स्वच्छता त्वरित व्हावी यासाठी निवेदन देत विनंती केली.
रत्नागिरी शहरासाठी साळवी स्टॉप येथे असलेला कचरा डेपो या ठिकाणी सतत कचऱ्याला आग लावण्याचे प्रकार होत असून यामुळे तेथील नागरिकांना धुराचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने सर्वप्रथम या ठिकाणी उपाययोजना करत तातडीने नगर परिषदेचा घनकचरा प्रकल्प सुरू करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात आली.
रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील नागरिकांच्या तक्रारीनुसार स्थानिक कार्यकर्ते निलेश आखाडे यांनी नगरपालिकेला उनाड कुत्र्यांचा होणारा त्रास व डासांचा प्रादुर्भाव यासाठी उपाययोजना करण्याचे निवेदन देण्यात आले होते. याबाबत देखील विचारणा भाजपा पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली. उनाड कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांना त्रास होत असून दामले विद्यालय परिसरात विद्यार्थ्यांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. उनाड कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. अशी माहिती उपस्थित अधिकारी यांनी दिली. तसेच डास प्रतिबंधक फवारणी उद्यापासून लगेचच या प्रभागात सुरू करणार असल्याचे स्वच्छता पर्यवेक्षक यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष राजेशजी सावंत, शहर अध्यक्ष राजेंद्र फाळके,माजी नगरसेविका प्रणाली रायकर, माजी नगरसेविका सुप्रिया रसाळ, दादा ढेकणे, निलेश आखाडे, मंदार खंडकर, शैलु बेर्डे, सायली बेर्डे, भक्ती दळी, कुंभार मॅडम, अमित विलणकर, विनय मसुरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.