
*नवी दिल्ली l 25 फेब्रुवारी-* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता वजन कमी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी त्यांनी स्वतःला फिट ठेवलेल्या दहा जणांची नावे आदर्श म्हणून जाहीर केली आहेत. या यादीत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनाही स्थान दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महिन्यातील ‘मन की बात’ या कार्यक्रमात लठ्ठपणा विरोधात मोहिमेची सुरुवात करण्याची घोषणा केली. त्यासाठी त्यांनी भोजनात तेल कमी करा, असेही आवाहन केले. फिटनेसचे आदर्श म्हणून दहा जणांची निवड केली आहे. त्यात जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, उद्योगपती आनंद महिंद्रा, नेमबाज मनु भाकर, वेटलिफ्टर मीराबाई चानू, तामिळ अभिनेते आर. माधवन व मोहनलाल, गायिका श्रेया घोषाल, इन्फोसीसचे माजी संस्थापक नंदन नीलकेणी, इन्फासीसच्या खासदार सुधामूर्ती, भोजपुरी गायक दिनेश लाल यांचा समावेश आहे. लठ्ठपणा कमी करणे व आहारातील तेलाचे प्रमाण कमी करण्यासाठी या व्यक्तींची निवड करण्यात आली असून, त्यांनी इतर दहा जणांना जोडून घ्यावे व ही साखळी अशीच पुढे चालवावी, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, तुम्ही आहारातील तेलाचे प्रमाण 10 टक्क्यांनी जरी कमी केले तरी त्यातून लठ्ठपणा कमी करण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल असेल. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी स्वच्छता अभियान सुरू केले होते. हे अभियान जगभर गाजले. आईवडिलांच्या नावाने एक झाड लावा, दरवर्षी देशातील एका ठिकाणी पर्यटनाला जा, अशीही आवाहने त्यांनी यापूर्वी केली आहेत.