ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग)
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना मुंबई येथे मारहाण झाल्या प्रकरणी पोलिसांकडून सीसीटीव्ही आणि तांत्रिक यंत्रणांच्या सहाय्याने तपास करत ठाण्यातील चिराग नगर येथून दोघांना चौकशी करिता ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहिती कळताच मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे व उपाध्यक्ष सुशांत सूर्यराव यांच्यासह शेकडो मनसैनिकांनी अटक केलेल्या तिघांच्या घरी हल्लाबोल करत पडताळणी केली आहे. तसेच यांनी ज्या संस्कृतीचा वापर केला आहे. त्याच संस्कृतीचा वापर करून आम्ही त्यांना प्रतिउत्तर देणार असल्याचे मनसैनिकांनी सांगितले. तसेच या मारहाण प्रकरणात जो कोणी म्होरक्या असेल त्याच्या देखील घरापर्यंत आम्ही पोहचू असा इशारा देखील मनसे कडून देण्यात आला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या मारहाणीनंतर ठाण्यातील मनसैनिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण पसरले आहे. या मारहाण प्रकरणात पोलिसांनी तांत्रिक यंत्रणांचा तपास करून ठाण्यातील चिराग नगर येथून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. या दोघांच्या राहत्या घरी आज ठाण्यातील मनसैनिकांनी हल्लाबोल केला. यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले की, आम्ही या ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींच्या घरी चौकशी केली आहे.
पकडण्यात आलेले दोन्ही संशयित आरोपी हे गुन्हेगारी पार्श्र्वभूमीचे आहेत. त्यांच्यावर ३०७ प्रमाणे गुन्हे दाखल असून या मारहाण प्रकरणात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमाचा वापर करण्यात आला असल्याचा आरोप यावेळी अविनाश जाधव यांनी केला आहे. या पूर्वी अशी संस्कृती नव्हती. पूर्वी आरोपाला प्रतिउत्तर हे शब्दात दिले जात होते. मात्र महाराष्ट्राच्या संस्कृतीत पहिल्यांदा अशी गोष्ट घडली आहे. त्यामुळे यांनी सुरू केलेल्या संस्कृतीच आम्ही पुरेपूर पालन करून त्यांनी वापरलेल्या संस्कृतीचा वापर करून आम्ही देखील त्यांना प्रतिउत्तर देण्याचा इशारा यावेळी मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.
जाहिरात :