
मुंबई- एकनाथ शिंदे एक घाबरलेला माणूस आहे. हे सर्व लाचार लोकं आहेत म्हणून ते काहीही वक्तव्य करतात. अमित शहा ज्यावेळी सत्तेत नसतील तेव्हा खरी शिवसेना आणि खोटी शिवसेना याचा निर्णय होईल, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, आज दहशत, दबाव पैशाचा प्रभाव आणि निवडणूक आयोग आपल्या हातात आहे म्हणून एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह मिळाले. एकनाथ शिंदेंनी स्वत:चा पक्ष स्थापन करत केवळ 5 आमदार निवडून आणून दाखवावे. अमित शहा, नरेंद्र मोदी अमृत पिऊन आले नाहीत. ते गेल्यावर जनता निर्णय घेईल.
विखे पाटील यांच्यावर डागले टीकास्त्र…
संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे नेहमीच हलके होते आता जे चॅलेज देत आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देत आहे. एकदा गुवाहटीमध्ये ते टाईट झाल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. राधाकृष्ण विखे पाटील कोण आहेत, त्यांना पहिले मंत्रीपद उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. त्यांच्या वडीलांना सुद्धा मंत्रीपद ठाकरेंनीच दिले आहे. ते 10 वेळा साडी बदलणारे लोकं आहेत असा टोला राऊतांनी विखे पाटील यांना लगावला आहे.
सीमाप्रश्नाच्या वादावर व्यक्त केले मत…
संजय राऊत म्हणाले की, आपला देश एक आहे, आपण सर्व जण देशाचे नागरिक आहोत. पण सीमाभागात मराठी शाळा बंद करणे, मराठी साहित्य संस्था बंद करण्याचे प्रकार घडतात. महाराष्ट्रातही कर्नाटकच्या अनेक संस्था आहेत, पण आम्ही तसे वागत नाही. हा एक भाषेचा विषय नाही. बेळगावमध्ये जर लोकं मराठी शाळा चालवू पाहत असतील तर त्यात काही गैर नाही. कारण आपल्याकडे कानडी आणि तेलगू शाळा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलवून घेत चर्चा केली पाहिजे.
बाळासाहेबांच्या घरात घुसून तुम्ही चोऱ्या करता…
संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना अमित शहांना लोहपुरुषाची उपमा दिली. त्यावरून संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे हे घाबरलेले व्यक्ती आहेत. लोहपुरुष जर अमित शहा आहेत तर सरदार वल्लभभाई पटेल, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कोण आहेत? हे एकनाथ शिंदे घाबरलेले, लाचार आहेत. खरी शिवसेना कोण व खोटी कोण हे अमित शहा सत्तेत नसतील तेव्हा सर्वांना कळेल. आज दहशत, दबाव, पैशांची ताकद, निवडणूक आयोग ताब्यात घेऊन तुम्ही सर्व करत आहात. एकनाथ शिंदेनी स्वत:चा पक्ष स्थापन करून पाच आमदार निवडून आणून दाखवावे. जे चिन्ह चोरलंय ते परत करावं व नवीन चिन्ह घेऊन लढवून दाखवावे. बाळासाहेबांच्या घरात घुसून तुम्ही चोऱ्या करता आणि आम्हाला अमित शहांची दादागिरी दाखवता. अमित शहा काही अमृत पिऊन आलेले नाहीत. कधी ना कधी जायचंच आहे प्रत्येकाला. तेव्हा जनता फैसला करेल
सीमाप्रश्नाच्या आंदोलनात शिंदे नव्हतेच…
संजय राऊत म्हणाले की, कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नावरुन एकनाथ शिंदेंनी कोणते आंदोलन केले, कधी आंदोलन केले त्यासाठी आम्ही जेलमध्ये गेलो. प्रताप सरनाईक ज्या आंदोलनाबद्दल बोलत आहेत त्यात 40 जणांना जेलमध्ये जावे लागले. यात एकनाथ शिंदेंचे नाव कुठेच दिसले नाही. ते कोणत्याही संर्घषात नव्हते. ते मुख्यमंत्री आणि मंत्री असताना देखील त्या भागात केव्हाच गेले नाही. त्यांना अटकेची भीती वाटत असल्याने कारभार असताना ते तिकडे गेले नाही.
भाजप अन् नैतिकतेचा संबंध नाही
संजय राऊत म्हणाले की, नैतिकता या सरकारच्या आसपास कुठेही फिरकत नाही. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घेतला होता. तो का घेतला हे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे. कारण त्यांनी ती मागणी केली होती. भाजपने ती मागणी केली होती पण आता ते यांच्या मांडीवर बसले आहेत, याला नैतिकता म्हणतात. तुम्ही ज्यांच्यावर आरोप केले त्यांना आज तुम्ही जवळ घेऊन बसला आहात. देवेंद्र फडणवीस आता गप्प का? नैतिकता भाजपजवळ जाण्यासाठी घाबरते, ती त्यांच्या आसपास फिरकतदेखील नाही.
नार्वेकरांकडून काहीच अपेक्षा नाही…
संजय राऊत म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर दबाव असल्याने ते खोटे बोलत आहे. ह्याच अध्यक्षांवर सुप्रीम कोर्टाने 40 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निकाल देण्याची जबाबदारी दिली होती. ते निकाल पत्र वाचताना ते अडखळत होते यावरुन ते कुठून तरी आले होते हे समजते, आणि ते केवळ वाचत होते. तेव्हाच 40 आमदार अपात्र ठरायला हवे होते. त्यांच्याकडून तुम्ही माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल काय अपेक्षा करणार. ते गेली 4 वर्षे खोटे बोलत आहेत असा टोलाही राऊतांनी नार्वेकरांना लगावला आहे.
तेव्हा 24 तासांत निर्णय घेतले.
संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधी, सुनील केदार यांच्याबाबतीत 24 तासांत निर्णय घेतल्या गेल्या आता का घेतले जात नाही हेच अध्यक्ष होते ना असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.