
दुबई- शुभमन गिलचं शतक, केएल राहुलचा विजयी षटकार आणि मोहम्मद शमीचे ५ विकेट्स… यासह भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील पहिल्याच सामन्यात बांगलादेशवर ६ विकेट्सने शानदार विजय मिळवला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना २२८ धावा केल्या. तर भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना ६ विकेट्सने आणि २१ चेंडू शिल्लक ठेवत जबरदस्त विजयाची नोंद केली. शुबमन गिल, मोहम्मद शमी हे भारताच्या विजयाचे हिरो ठरले.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात भारताला बांगलादेशने गोलंदाजीसाठी पाचारण केले. प्रथम फलंदाजीचा निर्णय बांगलादेशला चांगलाच महागात पडला अवघ्या 228 धावांवर बांगलादेशचा संघ गारद झाला. बांगलादेशच्या पहिल्या दोन विकेट गेल्यानंतर सुरुवात खूपच डळमळीत झाली. मेंहदी हसन मिर्झासुद्धा आज विशेष चमत्कार दाखवू शकला नाही. त्याने अवघ्या 5 धावा केल्या. परंतु, तोहिक ऱ्हिदोयने खेळपट्टीवर मजबूत उभे राहून संघासाठी शतकी खेळी केली. त्याला जाकर अलीने तेवढीच चांगली साथ दिली. जाकर अलीने 114 चेंडूत 68 धावा केल्या. रिषाद हुसेन, तान्झीम हसन साकीब, तस्कीन अहमद पूर्णपणे फ्लॉप ठरले. बांगलादेशकडून तौहीद ऱ्हिदोय आणि जाकर अलीने शानदार खेळी करीत बांगलादेशला एक सन्मानजनक स्कोअरपर्यंत नेले. परंतु बांगलादेशचा डाव 228 धावांवर संपुष्टात आला. भारतासमोर 229 धावांचे लक्ष्य दिले.
कर्णधार रोहित आणि शुबमन या सलामी जोडीने टीम इंडियाला आश्वासक सुरुवात करुन दिली. मात्र रोहित 41 या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला. टीम इंडियाने 69 धावांवर पहिली विकेट गमावली. रोहितनंतर विराट मैदानात आला. विराटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. विराटला अपेक्षित सुरुवातही मिळाली. मात्र विराट क्रिकेट चाहत्यांना मोठी खेळी करुन दाखवण्यात अपयशी ठरला. विराट 38 बॉलमध्ये 22 रन्स करुन आऊट झाला. विराटनंतर भारताने ठराविक अंतराने 2 विकेट्स गमावले. श्रेयस अय्यर 15 आणि अक्षर पटेल 8 धावा करुन माघारी परतले. त्यामुळे टीम इंडियाची 30.1 ओव्हरमध्ये 4 आऊट 144 अशी स्थिती झाली. टीम इंडिया काहीशी अडचणीत सापडली होती. मात्र तिथून शुबमन आणि केएल राहुल या दोघांनी डाव सावरला आणि भारताला विजयी केलं.