प्रयागराज l 01 फेब्रुवारी- ममता कुलकर्णीने काही दिवसांपूर्वीच महाकुंभमेळ्यात संन्यास घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर तिने किन्नर आखाड्यात आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची भेट घेतली होती. त्यानंतर ममताला महामंडलेश्वर बनवलं जाईल अशी घोषणा झाली. यासाठी ममताने संगममध्ये पिंड दानाचा विधी केला; मग किन्नर आखाड्यात ममताचा राज्याभिषेक झाला.
महाकुंभात संन्यास घेतल्यानंतर ममता कुलकर्णीला श्री यमाई ममता नंदगिरी असे नवीन आध्यात्मिक नाव देण्यात आले होते. तसेच किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पद तिला देण्यात आले होते. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात अभिनेत्री ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पद देण्यात आलं होतं. पण आता किन्नर आखाड्याने मोठी कारवाई केली आहे.
किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावरून हटवले आहे. इतकंच नाही तर तिची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी केली आहे. तसेच लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनादेखील आचार्य महामंडलेश्वर पदावरून हटवून आखाड्यातून बाहेर काढण्यात आलं आहे. किन्नर आखाड्याला लवकरच नवे आचार्य महामंडलेश्वर मिळतील. या दोन्ही व्यक्तींची हकालपट्टी केल्यानंतर आखाड्याची नव्याने पुनर्रचना केली जाईल, अशी माहिती ऋषी अजय दास यांनी दिली.