तिरुपती- आंध्रप्रदेशमधील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात टोकन वाटताना झालेल्या चेंगराचेंगरीत ६ भक्तांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वैंकुठद्वार सर्वदर्शनम टोकन वितरणाच्या दरम्यान हा प्रकार घडला. तिरुपती मंदिरातील विष्णू निवासम परिसरात ही दुर्घटना घडली.
हे टोकन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती. त्या गर्दीत सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तामिळनाडूमधील एका भक्ताचाही या मृतांमध्ये समावेश आहे. या चेंगराचेंगरीनंतर चार जणांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेचा आढावा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतला आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसराचा पोलिसांनी तात्काळ ताबा घेतला तसंच त्यांनी या परिसरातून भक्तांना सुखरुप बाहेर काढले.
मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी घटनास्थळावरील परिस्थिती हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांना फोन करून विचारपूस केली. तसेच यावेळी मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू यांनी उच्च अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य करण्याचा आदेश दिला आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत पावलेल्या भाविकांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री चंद्रबाबू यांनी दु:ख व्यक्त केले. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आज गुरुवारी सकाळी तिरुपतीला जाणार असून ते या चेंगराचेंगरीमध्ये जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेणार आहेत. तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री नायडू यांनी देवस्थान समितीला दिले आहेत.