ठाणे : प्रतिनिधी डोंबिवलीतील ६५ बेकायदा ‘रेरा’ घोटाळ्यातील इमारतींमधील आरोपी मे. गोल्डन डायमेंशन, मे. वास्तु रचना या आस्थपनांमधील (फर्म) वास्तुविशारद, त्यांच्या कार्यालयांची माहिती घेण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) अधिकारी दोन दिवसापासून डोंबिवलीत विविध भागात तपास करत आहेत. या दोन्ही आस्थापनांची वास्तवदर्शी माहिती मिळत नसल्याने ‘ईडी’चे अधिकारी चक्रावून गेले आहेत. रेरा घोटाळ्यातील ६५ बेकायदा इमारतींचा ईडीकडून तपास सुरू झाल्याने भूमाफियांची दाणादाण उडाली आहे.
डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतींसंबंधीचा अहवाल ईडीला काही दिवसापूर्वी प्राप्त झाला. त्या अनुषंगाने ईडीने तपास सुरू केला आहे. ईडीचा तपास ही भूमाफियांना शासनाने दिलेली हूल आहे, असा गैरसमज माफियांनी करून घेतला होता. प्रत्यक्ष तपास सुरू झाल्याने डोंबिवली परिसरात भागात मर्सिडिज, बीएमड्ब्ल्यु मधून फिरणारे माफिया शहरातून गायब झाले आहेत. त्यांच्या कार्यालयांमध्ये शुकशुकाट असल्याचे खात्रीलायक सुत्राने सांगितले.
६५ बेकायदा इमारत प्रकरणात सर्वाधिक बेकायदा बांधकाम आराखडे तयार करणाऱ्या मे. गोल्डन डायमेंशन, मे. वास्तु रचना या वास्तुविशारद आस्थापनांची (फर्म) ईडीने ‘द इंडियन इन्स्टिट्युट ऑफ आर्किटेक्ट’च्या महाराष्ट्र संस्थेकडून सविस्तर माहिती मागवली आहे. ही माहिती हाती लागण्यापूर्वीच ईडीच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवस डोंबिवली शहराच्या विविध भागात फिरुन गोल्डन डायमेंशन (ऐश्वर्या किरण, देसलेपाडा, भोपर रोड, नांदिवली पाडा, डोंबिवली पूर्व आणि सुदर्शन व्हिला सोसायटी, केळकर रोड, डोंबिवली पूर्व), वास्तु रचना (पत्ता व नाव नाही) या दोन आस्थपनांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना संबंधित पत्त्यावर या संस्थांचे अस्तित्व आढळून आले नाही.
ईडीला गोपनीय प्राप्त माहितीनुसार जून २०२२ पर्यंत गोल्डन डायमेंशनच्या शीर्षक पत्रावर वास्तुविशारदाचा उल्लेख न करता थेट स्वाक्षरी आणि लहान आकाराचा शिक्का मारला जात होता. सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये रेरा घोटाळाप्रकरणात या आस्थापनेचे नाव पुढे येताच या आस्थापनेचा शिक्का मोठा करुन नावात फेरबदल करुन ते गोल्डन डायमेंशन्स करण्यात आले. वास्तुविशारद म्हणून स्वाक्षरी, शिक्का मारला जात आहे, असे ईडी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. वास्तु रचना आस्थापनेचा पत्ता अधिकाऱ्यांना निश्चित होत नाही. या दोन्ही आस्थापना मागील अनेक वर्षापासून कोण चालवित आहे. त्यांची निश्चित नावे स्पष्ट होत नसल्याने तपास अधिकारी गोंधळून गेले आहेत.
जाहिरात :