रत्नागिरी : मालतीबाई व बाबुराव जोशी यांचे प्रयत्न आज निश्चितपणे फळाला आले आहेत. आज ही संस्था समाज कसा घडवला पाहिजे हा विचार घेऊन काम करत आहे. ज्यांनी ज्यांनी या संस्थेत निस्वार्थपणे सेवा केली त्यांच्या मदतीनेच हे कार्य चालू आहे. गेल्या वर्षभरात संस्थेची झालेली प्रगती विलक्षण आहे. कै. बाबुराव जोशी आणि कै. मालतीबाई जोशी यांनी स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची ज्योत प्रज्वलित केली. निराबाई हेगडे, चंद्राबाई देशपांडे आणि सोनू देशपांडे तीन मुलींना घेऊन १ जानेवारी १९२५ रोजी शाळा सुरू झाली, ही ऐतिहासिक घटना आहे, असे प्रतिपादन केंद्रीय उर्जामंत्री तथा र. ए. सोसायटीचे अध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी केले.
जांभेकर विद्यालयाची शताब्दी व रा. स्व. संघाची शताब्दी या दोन्ही शुभ घटनांमध्ये एक धागा आहे. पूर्वजन्मीच्या पुण्यकर्मामुळे मला गोव्यातून रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याची संधी मिळाली. तापलेल्या वाळूत पाय पोळावेत आणि अपमान पदरात घेऊन केवळ लोकसेवेसाठी स्वतःला झोकून देणारे व्यक्तिमत्व म्हणजे कै. बाबुराव जोशी आणि कै. मालतीबाई जोशी. त्यांनी सामाजिक सेवेसाठी शिक्षण क्षेत्र निवडले. तत्कालीन सामाजिक व्यवस्थेत चूल आणि मूल या चौकटीत बंदिस्त, गुरफटलेल्या स्त्रीला मुक्त करण्यासाठी या दांपत्याने स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची ज्योत प्रज्वलित केली, असे प्रतिपादन केंद्रीय उर्जा राज्यमंत्री व सोसायटीचे अध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी केले. सोसायटीची मातृसंस्था सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयाच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.
मंत्री श्रीपाद नाईक पुढे म्हणाले की, माजी विद्यार्थी अनिल तोरगलकर यांनी दिलेल्या पाच कोटी रुपये देणगीतून महाविद्यालय इमारत, रमा पुरुषोत्तम फाउंडेशन (पुणे) यांच्या रूपाने ८ कोटी ३५ लाख देणगीतून विद्यार्थिनी वसतीगृह आणि पीएम उषां योजनेतर्गत पाच कोटी अनुदानातून कनिष्ठ महाविद्यालयाची इमारत नवीन बांधकाम व महाविद्यालय मुख्य इमारत दुरुस्ती नूतनीकरण अशी एकाच वेळी बांधकामे सुरू आहेत. शिल्पाताई व सर्व पदाधिकारी, सहकारी चांगले काम करत आहेत.
कार्यक्रमाला कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, उपाध्यक्ष डॉ. मुकुंद जोशी, उपाध्यक्ष अॅड. विलास पाटणे, उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, शाळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र मलुष्टे आणि जोशी, जांभेकर कुटुंबातील प्रज्ञा जांभेकर, नीता जांभेकर, विजय जांभेकर, डॉ. माधुरी लोकापूर, गिरीष जोशी, सुनंदा पटवर्धन, मुख्याध्यापक अनिल चव्हाण आणि नियामक मंडळ सदस्य उपस्थित होते. राजेंद्र मलुष्टे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, पुस्तकी अभ्यासासोबतच मुलांमधील कौशल्यांचा विकास करत सामाजिक मूल्य जपणारी आदर्श नागरिकांची पिढी घडवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. या प्रयत्नांना विविध समाजघटकांनी आणि शासनाने साथ द्यावी. सौ. संजना तारी यांनी सूत्रसंचालन केले.
शिल्पाताई पटवर्धन म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले यांच्याप्रमाणे आणि बाया व महर्षी कर्वे यांच्याकडून प्रेरणा घेऊन मालतीबाईनी रत्नागिरीत स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू केली. महिला विद्यालयाचे नामकरण गोदुताई जांभेकर विद्यालय असे करण्यात आले. या गोदुताई यांनी देखील चौथी इंग्रजीच्या शिक्षणानंतर नर्सिंगचा कोर्स करून साडेतीन हजार महिलांवर विनामोबदला उपचार केले. फक्त पदवी शिक्षण घेऊन नव्हे तर मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी काय करता येईल हा प्रयत्न संस्था करणार आहे. कौशल्य विकासाकरिता संस्था येथे नवा प्रकल्प सुरू करणार आहे.