विनोद कांबळीचा रुग्णालयात भन्नाट डान्स; पाहा व्हिडिओ…

Spread the love


माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीनं तब्येत सुधारताच रुग्णालयात डान्स केला. याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

ठाणे : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीनं तब्येत सुधारताच रुग्णालयात ‘चक्र दे इंडिया’ या हिंदी गाण्यावर भन्नाट डान्स केला. त्याच्या उत्साही डान्सनं रुग्णालयातील कर्मचारी आणि उपस्थितांनाही प्रेरित केलं. उपचारादरम्यान सकारात्मक उर्जा ठेवत त्यानं सर्वांशी संवादही साधल्याचं या डान्स व्हिडिओमुळं समोर आलं आहे.

डान्सची सर्वत्र चर्चा :

विनोद कांबळीनी सांगितलं, “तुमच्या प्रेमामुळंच मी इथपर्यंत पोहोचलो आहे.” त्यानं रुग्णालय संचालक शैलेश ठाकूर यांचे विशेष आभार मानले. त्याच्या डान्सची चर्चा सोशल मीडियावर होत असून चाहत्यांनी त्याच्या जलद पुनर्वसनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कांबळी लवकरच मैदानावर परत येण्याचा विश्वास व्यक्त करत सर्वांना सकारात्मकता आणि जोशाचा संदेश देत आहे. 23 डिसेंबर रोजी भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू विनोद कांबळीला प्रकृती अस्वस्थतेमुळं भिवंडीतील काल्हेर येथील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे आकृती रुग्णालयाचे संचालक शैलेश ठाकूर हे बालपणापासून क्रिकेटचे चाहते असून त्यांनी विनोद कांबळीचे अनेक सामने पाहिले आहेत.

प्रकृतीत बऱ्यापैकी सुधारणा :

सोशल मीडियावर कांबळीच्या प्रकृती अस्वस्थतेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी भावनिक होत त्यांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तात्काळ कांबळीला रुग्णालयात दाखल करुन घेतलं. सध्या तीन डॉक्टरांची टीम त्याच्यावर उपचार करत असून त्याच्या प्रकृतीमध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाल्यानं त्याला अतिदक्षता विभागातून आता जनरल वार्ड मध्ये उपचार सुरु असल्याचं सांगण्यात आलं.


शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून मदत –

क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची सध्याची परिस्थिती पाहता कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कांबळी यांस वैयक्तिक ५ लाख रुपयांची मदत करण्याचं जाहीर केलं आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून ही मदत पुढील आठवड्यात करण्यात येणार असून येणाऱ्या काळात त्यांना अजून मदत करण्याचं खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आश्वासन दिल्याचं ओएसडी मंगेश चिवटे यांनी सांगितलं.

याआधीही खालावली होती प्रकृती :

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा एक व्हिडिओ 10 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओत विनोद कांबळीला चालताना त्रास होत असल्याचं स्पष्ट दिसत होतं. चालण्यासाठी दोन व्यक्ती त्याच्या हाताला धरून मदत करत होते. आपल्या दमदार फलंदाजीनं गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या विनोदची अशी अवस्था पाहून क्रिकेट चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात होती.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page