पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात विजयाची नोंद केली आहे.
जोहान्सबर्ग : पाकिस्तान क्रिकेट संघानं डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे तिसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 36 धावांनी पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानकडून गोलंदाज आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना सॅम अयुबच्या शतकाच्या जोरावर 308 धावा केल्या. यानंतर आफ्रिकेचा संघ 42 षटकांत 271 धावाच करू शकला. हा सामना जिंकून पाकिस्तानी संघानं मालिकाही जिंकली आहे.
सॅम अयुबची उत्कृष्ट फलंदाजी-
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सॅम अयुब सर्वात मोठा हिरो ठरला आहे. त्यानं या मालिकेत दोन शतकं झळकावली आणि दोन्ही वेळा पाकिस्तानला विजय मिळवून दिला. तो या मालिकेत सर्वाधिक 235 धावा करणारा पाकिस्तानी फलंदाज होता. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे. त्याच्यामुळंच पाकिस्तानी संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत क्लीन स्वीप करण्यात यशस्वी ठरला आहे.
पाकिस्तानी संघानं रचला इतिहास-
पाकिस्तानी संघानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध क्लीन स्वीप करुन इतिहास रचला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघ आफ्रिकेच्या भूमीवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत क्लीन स्वीप करणारा पहिलाच संघ ठरला आहे. पाकिस्तानपूर्वी कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आली नव्हती. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघाने हा ऐतिहासिक विक्रम केला आहे.
सुफियान मुकीमच्या चार विकेट-
या सामन्यात पाकिस्तानकडून सॅम अयुबनं 101 धावा केल्या. त्याच्याशिवाय मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांनी अर्धशतकी खेळी खेळली. सलमान अली आगानं 48 धावांचे योगदान दिलं. तय्यब ताहिर 28 धावा करण्यात यशस्वी ठरला. या खेळाडूंमुळेच पाकिस्तानी संघ 300 धावांचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरला. फलंदाजांनंतर गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. सुफियान मुकीमनं सर्वाधिक चार विकेट घेतल्या. शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.