ठाणे :- शहरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या भंगार गाड्या उचलण्याची कारवाई शहरात सुरू असून मंगळवारी नुकतीच इंटरनिटी मॉल ते ज्ञानसाधना महाविद्यालय येथील सर्व्हिस रोडवरील तीन चाकी व चार चाकी बंद व भंगार अवस्थेतील गाड्या वाहने हटविण्याची कारवाई करण्यात आली. सदरची भंगार वाहने ही बाटा कंपाऊंड येथे जमा करण्यात आली आहेत.
शहरातील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या जागा मोकळ्या असणे गरजेचे आहे. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या भंगार अवस्थेतील गाड्यांचा त्रास नागरिकांना व वाहतूकीस होवून परिसरात वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा भंगार अवस्थेतील गाड्या नजरेस पडल्या तर त्या तात्काळ हटविण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व विभागाच्या उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.
आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशानुसार परिमंडळ 2 चे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या उपस्थितीत सहाय्यक आयुक्त व स्थानिक पोलीसांच्या मदतीने सदरच्या भंगार गाड्या उचलण्याची कारवाई करण्यात आली. यात चार चाकी गाड्या, दुचाकी, तसेच भंगार अवस्थेतील शववाहिका उचलण्यात आली. तसेच या ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या खाजगी बसेस, हातगाड्या देखील हटविण्यात आल्या असल्याचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी नमूद केले. संपूर्ण शहरात वेळोवेळी ही कारवाई सुरू रहावी याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तिन्ही परिमंडळ उपायुक्तांना दिले आहेत. तसेच नागरिकांनीही याबाबत काही तक्रारी असतील तर आपत्कालीन विभागाशी 8657887101 / 8657887102 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे