देवरूख आगारव्यवस्थापक राजेश पाथरे यांना मुरादपूर सरपंच मंगेश बांडागळे यांनी सादर केले निवेदन…
निलेश जाधव | देवरूख | फेब्रुवारी २८, २०२३.
देवरूख आगारातून साखरपा- मुंबई ही नवीन बसफेरी सुरू करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन मुरादपूर गावचे सरपंच मंगेश बांडागळे यांनी देवरूख आगारव्यवस्थापक राजेश पाथरे यांना सादर केले आहे.
मुंबईला जाणारी किंवा मुंबईहून साखरप्याला येणारी एकही बसफेरी देवरूख आगारातून सुरू नाही. परिणामी मुंबईला जाणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे देवरूख आगाराची साखरपा- मुंबई ही बसफेरी लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, अशी मुरादपूर ग्रामस्थांची मागणी आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मुरादपूर सरपंच मंगेश बांडागळे यांनी सरपंच झाल्यापासून गावात विकासकामांचा धडाका लावला आहे. ते ग्रामस्थांसाठी विविध उपक्रम राबवत आहेत. गोरगरीबांना मदत करत असतात. तसेच ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात. आता त्यांनी साखरपा-मुंबई बसफेरी सुरू करण्याची मागणी देवरूख आगारव्यवस्थापकांकडे मुरादपूर ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देतेवेळी मुरादपूरचे माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र महाडिक उपस्थित होते.