पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याबाबतचा मेसेज शनिवारी मुंबई पोलिसांना मिळाला.
*मुंबई :* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा एक मेसेज शनिवारी मुंबई पोलिसांना मिळाला. या धमकीनंतर आता पोलीस अलर्ट मोडवर आले असून, याप्रकरणी चौकशी सुरू आहे. पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज अजमेर, राजस्थान येथून पाठवण्यात आल्याचं तपासात समोर आलं आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. याआधीही असे मेसेज, कॉल मुंबई पोलिसांना आले होते.
*बॉम्बस्फोट घडवण्याचा कट :* मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर धमकीचा मेसेज करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. दोन आयएसआय एजंट आणि पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट असल्याचा उल्लेख या मेसेजमध्ये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
*यापूर्वीही अनेकदा आले धमकीचे मेसेज :* मेसेज पाठवणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ किंवा त्यानं दारूच्या नशेत हा मेसेज पाठवला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर यापूर्वीही अनेकदा फसव्या धमकीचे मेसेज आले होते.
*हॉक्स कॉल? :* याआधी अशा प्रकरणांमध्ये पोलिसांना असंही आढळून आलं आहे की, काही लोक दारूच्या नशेत किंवा मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त असल्यानं असे धमकीचे मेसेज किंवा कॉल करतात. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देणारी व्यक्ती दारूच्या नशेत असावी किंवा मानसिकदृष्ट्या समस्यांनी ग्रस्त असावी, असाही संशय व्यक्त करण्यात येत असल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.