राज्यसभेत विरोधी पक्षाच्या बाकांवर नोटांचं बंडल सापडलं असून या प्रकरणी जोरदार गदरोळ संसदेत झाला आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय.राज्यसभेत अभिषेक सिंघवी यांच्या बाकावर पैसे सापडले असं सभापती धनखड यांनी सांगितलं.
नवी दिल्ली: राज्यसभेत काँग्रेस नेत्याच्या बाकावर नोटांचं बंडल सापडल्याने सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. या घटनेबाबत खुद्द सभापती जगदीप धनखड यांनी सभागृहात ही माहिती दिली आहे. ही गंभीर बाब असून त्याची चौकशी करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
शुक्रवारी अध्यक्ष जगदीप धनखड यांनी माहिती दिली, ‘काल (गुरुवारी) सभागृह तहकूब झाल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली की सीट क्रमांक 222 मधून रोख रक्कम सापडली आहे. ही जागा खासदार अभिषेक मनू सिंघवी यांना देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास नियमानुसार व्हायला हवा आणि तोही केला जात आहे.’
खरगे यांनी घेतला आक्षेप
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी नोटांचं बंडल मिळाल्याचे सांगताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ सुरू केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, ‘जोपर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि सर्वकाही स्पष्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही (अध्यक्षांनी) त्यांचे (अभिषेक मनू सिंघवी) नाव घ्यायला नको होते.’
खरगे यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ केला. त्यावर खरगे म्हणाले की, ‘अशी चिखलफेक करून देशाची बदनामी केली जात आहे. तुम्ही (अध्यक्ष) कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचे नाव आणि जागा याबद्दल कसे काय बोलू शकता?’ खरगे यांच्या आरोपांवर सभापती म्हणाले की, ‘पैसे कोणत्या बाकांवर सापडले आहेत आणि ती जागा कोणाला दिली गेली आहे एवढंच मी सांगितलं आहे.’
दोन्ही बाजूंनी निषेध केला पाहिजे: नड्डा…
भाजपचे प्रमुख आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा म्हणाले, ‘ही अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर समस्या आहे. हा सभागृहाच्या प्रतिष्ठेवरचा हल्ला आहे. योग्य तपास होईल, असा मला विश्वास आहे. मला आशा होती की, आमचे विरोधी पक्षनेतेही सविस्तर चौकशीची मागणी करतील. विरोधकांनी नेहमी सद्सदविवेक बुद्धी जपली पाहिजे. स्वस्थ मन आणि निरोगी भावनेसह हे प्रकरण समोर आलं पाहिजे. या प्रकरणाचा सत्ताधारी आणि विरोधक असा दोघांनी निषेध केला पाहिजे.’
या प्रकरणावर अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, ‘मी हे पहिल्यांदाच ऐकले आहे! मी जेव्हाही राज्यसभेत जातो तेव्हा केवळ एक 500 रुपयांची नोट सोबत ठेवतो. काल दुपारी 12.57 वाजता मी घरात पोहोचलो आणि 1 वाजता सभागृह सुरू झाले. त्यानंतर मी खासदार अयोध्या रामी रेड्डी यांच्यासोबत दुपारी दीड वाजेपर्यंत कॅन्टीनमध्ये बसलो आणि मग संसदेतून बाहेर पडलो!’