देवरुख- सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध उद्योजक श्रीपत शिंदे यांनी सामाजिक बांधिलकी जपत बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या दादासाहेब सरफरे विद्यालय शिवणे-बुरंबी मधील कबड्डी, खो-खो (मुलगे-मुली) आणि मैदानी खेळामध्ये खेळणाऱ्या तसेच राज्यस्तरावर नैपुण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंना २५ हजार रुपयांचे किट दिले आहे. या किटचे मंगळवारी सकाळी विद्यालयाच्या सभागृहामध्ये मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शांताराम भुरवणे, सेक्रेटरी शरद बाईत, सामाजिक कार्यकर्ते व मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, संस्थेचे संचालक दिनेश जाधव, संचालक सचिन मोहिते, मुख्याध्यापक प्रकाश वीरकर, पर्यवेक्षक महावीर साठे व विद्यालयातील शिक्षकवृंद उपस्थित होते. याकिटमध्ये कबड्डी, खोखो (मुलगे-मुली) संघासाठी शॉर्ट व टी-शर्ट आणि मैदानी खेळामध्ये खेळणाऱ्या शॉर्ट व स्लीव्हज टी-शर्ट तसेच राज्यस्तरावर नैपुण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंना फुल अपर देण्यात आले. असे सुमारे ४६ खेळाडुंना हे किट देण्यात आले. उद्योजक श्रीपत शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकल्याने त्यांच्या वतीने जितेंद्र चव्हाण उपस्थित होते. यावेळी श्री. चव्हाण म्हणाले तालुक्यातील या शाळेमध्ये अनेक उपक्रम राबविले जातात.
संस्थादेखील मोठ्या उत्साहाने अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याकरिता मोठा वाटा उचलते. म्हणूनच विद्यार्थी घडण्यामध्ये संस्थेचा वाटा महत्त्वाचा असल्याचे सांगून विद्यार्थी वर्गाने कला क्रीडा गुणांना विकसित करण्याबरोबरच उच्चपदस्थ अधिकारी बना असाही सल्ला त्यांनी दिला. संस्था उपाध्यक्ष शांताराम भुरवणे म्हणाले विद्यार्थ्यांना पुढे जाण्याकरिता अनेक जणांचे सहाय्य होत असते. असे सहाय्य श्रीपत शिंदेकडून वारंवार होत आहे. शिंदे यांना संस्थेकडुन धन्यवाद त्यांना द्यावे तेवढे थोडे असल्याचे सांगितले. यानंतर भुरवणे म्हणाले मुख्यमंत्री माझी शाळा या अभियानात दादासाहेब सरफरे विद्यालयाने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल विद्यार्थी वर्गासह शिक्षकवृंद यांचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जपण्याकरिता वाचनावर अधिक भर द्या असाही सल्ला यावेळी त्यांनी दिला.