![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/12/1000924376.webp)
मुंबई- ही निवडणूक ही विधानसभेची नेहमी सारखी निवडणूक नसून खास निवडणूक होती. जनतेने हरियाणा अन् आता महाराष्ट्रात जो कौल दिला आहे, तो विकसित भारतासाठी दिल्याचे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
निर्मला सीतारामन पुढे बोलताना म्हणाल्या की, यापूर्वी काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकारमुळे अस्थिरता निर्माण झाली होती. विकासाचा मुद्दा अडकून पडला होता हे लक्षात घेत जनतेने महायुतीला हे बहुमत दिले आहे.
राज्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार…
निर्मला सीतारामन म्हणाल्या की, राज्यातील अनैसर्गिक आघाडीमुळे महाराष्ट्रात हे काय सुरू आहे, अशी भावना जनतेमध्ये निर्माण झाली होती, यातून जनतेनी हा कौल दिला आहे, असे म्हणत शिवसेना- काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मविआच्या प्रयोगावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी जाहीर नाम्यातील सर्व गोष्टी करणार आहोत हे स्पष्ट आहेत.
काँग्रेसवर डागले टीकास्त्र…
निर्मला सीतारामन म्हणाल्या की, काँग्रेसच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे किती नुकसान झाले हे लोकांना आठवण करुन देत आम्ही आता लवकरात लवकर महाराष्ट्राला शेती, उद्योग यासह सर्वच गोष्टीमध्ये पुढे घेऊन जाणार आहोत. देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्रात आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर स्टार्टअप सुरू होत आहे. काँग्रेस काळात ज्या ज्या विषयात राज्य मागे पडले ते आता पुढे न्यायचे आहे. तर आषाढी वारीसाठी कॉरिडोअर बनवण्यासाठी प्रयत्नशील आहोत असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.
फडणवीसांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड…
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 11 दिवसांनी आज नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली असे म्हणता येईल. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ शकतात. विधीमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. आज दुपारी महायुतीमधील नेते राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करतील. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता आझाद मैदान, मुंबई येथे शपथविधी होणार आहे.