विधीमंडळात वातावरण तापल्यानंतर मंत्र्यांना जाग, २४ तासांत हिरकणी कक्ष सुरू…

Spread the love

मुंबई | फेब्रुवारी २८, २०२३.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे या आपल्या लहान बाळासह काल अधिवेशनात आल्या होत्या. राज्य सरकारतर्फे त्यांना थांबण्यासाठी विधीमंडळाच्या आवारात हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. परंतु काल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अहिरे यांना थांबण्यासाठी देण्यात आलेल्या हिरकणी कक्षाची अवस्था अत्यंत खराब होती. त्या कक्षामध्ये सर्वत्र धुळ होती. अहिरे या आपल्या बाळाची तब्येत बरी नसताना देखील सभागृहात आल्या होत्या. काल माध्यमांसमोर बोलताना त्यांचे डोळे पाणावले होते. यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी फोनवर अहिरे यांच्याशी संवाद साधत हिरकणी लक्ष चांगला करुन देणार असे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी हा आज हिरकणी कक्ष सुस्थितीत करुन दिला.

यावेळी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले की, ‘देवळाली विधानसभेच्या विद्यमान आमदार माझ्या सहकारी सरोजताई अहिरे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपल्या ५ महिन्याच्या बाळासह सहभागी झाल्या असता त्यांना हिरकणी कक्षात ज्या असुविधांना तोंड द्यावे लागले. त्या संदर्भात त्यांना मी येत्या २४ तासांत सुसज्ज असा हिरकणी कक्ष उपलब्ध करून देईल अशी ग्वाही दिली होती. त्याप्रमाणे आज विधापरिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांच्या उपस्थितीत आया, नर्स, डॉक्टर, स्वच्छ बेड – पाळणा व इतर सुविधांनी सुसज्ज असा हिरकणी कक्ष सरोज ताई व त्यांच्या बाळाला उपलब्ध करून देण्यात आला.’

कक्षात केलेल्या व्यवस्थेबद्दल सरोजताई यांचे समाधान झाले व त्यांनी एवढ्या तत्परतेने तक्रारीची दखल घेत स्वतः जातीनिशी तक्रार निवारण केल्याबद्दल आरोग्यमंत्री मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे आभार व्यक्त केले. आपल्या कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडत कर्तव्यदक्ष असणाऱ्या महीला पोलिसांसाठी असे हिरकणी कक्ष येत्या काळात उभारण्याचा मानस आरोग्यमंत्री मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केला.

त्यानंतर आज हिरकणी कक्षात आमदार सरोज अहिरे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत ही मंडळी आली होती.  यावेळी तानाजी सावंत यांनी अहिरे यांच्या बाळाला कडेवर घेतले होते. तेव्हा नीलम गोऱ्हे यांनी सावंतांना मिश्किल टोला लगावला. बाळाला घ्या नाहीतर गुवाहाटीला घेऊन जातील, असे त्या म्हणाल्या. यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page