जम्मू काश्मीरमध्ये लिथियमचे मोठे साठे सापडल्यानंतर आणखी एक गुडन्यूज मिळाली आहे. ओडिशा राज्यातील तीन जिल्ह्यात जमिनीखाली सोन्याचे मोठे साठे असल्याचे संकेत मिळाले आहेत. भारतीय भूविज्ञान सर्वेक्षण आणि ओडिशा सरकारच्या भूविज्ञान निर्देशालयाने सर्वेक्षण केले होते. या सर्वेमध्ये देवगड, क्योंइर आणि मयूरभंज या तीन जिल्ह्यात जमिनीखाली सोन्याचे साठे असल्याचे संकेत मिळाले आहेत.
राज्याचे खाणमंत्री प्रफुल्लकुमार मलिक यांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली. या ठिकाणी मागील दोन वर्षात तीन वेळा सर्वेक्षण करण्यात आले होते. राज्यातील तीन जिल्ह्यात जमिनीखाली सोन्याचे साठे असल्याचे संकेत मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये क्योझर जिल्ह्यातील दिमिरीमुंडा, कुशकला, गोटीपूर, गोरपूर तर मयूरभंज जिल्ह्यातील जोशीपूर, सुरियागुडा, रुआंसिला, धुशुरा तसेच देवगड जिल्ह्यातील अदास या भागांचा समावेश आहे.
या ठिकाणी सन १९७० आणि ८० च्या दशकात सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, या सर्वेक्षणातून काय माहिती मिळाली हे गोपनीय ठेवण्यात आले होते, असे मलिक यांनी सांगितले.आमदार सुधीरकुमार सामल यांनी या संदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. या संभाव्य साठ्यांमध्ये किती सोने आहे, याचा अंदाज अद्याप आलेला नाही.
सोन्याच्या दरांत विक्रमी वाढ, प्रतितोळ्याचा दर ५८ हजारांवर…
दरम्यान, याआधी जम्मू काश्मीरमध्ये लिथियमच साठे सापडले आहेत. येथे जवळपास ५९ टन लिथियम आहे. चिली आणि ऑस्ट्रेलियानंतर हे जगातील सर्वात मोठे लिथियमचे साठे असल्याचे सांगण्यात येत आहे. लिथियम हा असा नॉन फेरस धातू आहे ज्याचा वापर मोबाइल, लॅपटॉप, इलेक्ट्रिक व्हेइकलबरोबरच अनेक उपकरणांमध्ये केला जातो ज्यामध्ये रिचार्जेबल बॅटरी वापरली जाते. आतापर्यंत लिथियमसाठी भारत इतर देशांवर अवलंबून होता.