रत्नागिरी : सांगली शहरातील शासकीय रुग्णालयाच्या मागील बाजूस असणाऱ्या सावंत प्लॉट परिसरात मित्राकडून चाकूने भोसकून वेटरचा निर्घृण खून करण्यात आला. शैलेश कृष्णा राऊत (वय २६, मूळ रा. लांजा, रत्नागिरी, सध्या रा. पारिजात कॉलनी, सावंत प्लॉट) असे या वेटरचे नाव आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास झालेल्या घटनेने शहरात खळबळ उडाली.
दरम्यान, घटनेनंतर विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बारा तासांच्या आत संशयित दोघांसह अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. किरकोळ कारणातून हे कृत्य झाल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. सुमित संतोष मद्रासी (वय २३, रा. इंदिरानगर झोपडपट्टी) आणि सौरभ बाबासाहेब कांबळे (२२, त्रिमूर्ती कॉलनी, सांगली) अशी त्या दोघांची नावे आहे.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत शैलेश राऊत हा रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील आहे. तो सांगलीतील महावीर उद्यानजवळील ओम फूड हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो. संशयित सुमित मद्रासी, सौरभ कांबळे व अल्पवयीन मुलगा हे एकमेकांचे मित्र होते. संशयित काल शैलेश कामास असलेल्या हॉटेलमध्ये मद्यप्राशन करण्यासाठी गेले होते. त्यानंतर पुन्हा ते सावंत प्लॉट येथील मराठा सेवा संघाच्या सांस्कृतिक भवन शेजारील खुल्या जागेत आले. रात्री नऊच्या सुमारास मृत शैलेश हा त्याठिकाणी आला. तेथे पुन्हा ते मद्यप्राशन करू लागले.
त्यावेळी चौघांत किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद टोकाला गेल्यानंतर मृत शैलेश याने स्वतःजवळील चाकू काढला. तेव्हा इतर तिघांनी त्याच्याकडून चाकू काढून घेतला. धक्काबुक्की करत संशयिताने शैलेश याला भोकसले. त्यावर शैलेश तेथून पळत सुटला आणि रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. दरम्यान, अतिरक्तस्त्रावाने शैलेशचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती विश्रामबाग पोलिसांना मिळाली. निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्यासह पथक दाखल झाले. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांचेही पथक दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. ठसे तज्ज्ञांची टीमही दाखल झाली. घटनास्थळी मृत शैलेश याची चप्पल, दुचाकी मिळून आली. घटनेनंतर शैलेशचे मेहुणे संग्राम चंद्रकांत चव्हाण यांनी फिर्याद दिली.
दरम्यान, संशयितांच्या शोधासाठी विश्रामबागसह एलसीबीचे पथक रवाना करण्यात आले. तांत्रिक माहितीसह कौशल्यपूर्ण तपास करत पोलिसांनी बारा तासांत संशयितांची नावे निष्पन्न केली. उपनिरीक्षक कुमार पाटील, सुमित सूर्यवंशी, विनायक सुतार यांच्यासह पथकाने संशयितांना धामणी रस्त्यावरून ताब्यात घेतले. त्यांनी खुनाची कबुली दिली. संशयितांना विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
त्याच्याच चाकूने दोनच वार…
मृत शैलेश यानेच चाकू आणला होता. वाद झाल्यानंतर त्याने चाकू काढून संशयित हल्लेखोरांवर उगारण्यास सुरुवात केली. त्यावर संशयितांनी चाकू काढून घेतला. एका संशयिताने चाकूने छातीत आणि पोटात दोन वार केले. त्यात शैलेशचा मृत्यू झाला.
जन्माअधीच मूल पोरकं!
मृत शैलेश हा कोकणातील आहे. काही वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. तो आणि पत्नी सावंत प्लॉट येथे राहात होते. पत्नी बाळंतपणासाठी गावी गेली होती. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून तो एकटाच राहत होता. शैलेशचे मूल जन्माला येण्याअधीच पोरके झाले.