नवी दिल्ली- दिल्लीत रात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये सुमारे अडीच तास खलबतं झाली. मात्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स कायम आहे. दरम्यान, या भेटीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सर्वजणांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत असताना एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावरील हसू गायब असल्याचे दिसून आले. त्यांचा गंभीर चेहरा बरंच काही सांगून जात होता.
महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असणार? उपमुख्यमंत्री किती असणार? मंत्रिमंडळ कसं असेल? शपथविधी कधी होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच महाराष्ट्राला मिळणार आहेत. महाराष्ट्रातील लोकांना पडलेल्या या प्रश्नावर नवी दिल्लीत महाबैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चर्चा केली आहे. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यानं मुख्यमंत्रिपद भाजपलाच मिळणार हे स्पष्ट झालं आहे.
मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीसांनाच मिळणार हे तिथल्या नेत्यांच्या बॉडी लँग्वेजमधून दिसत होतं. अमित शाहांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावर हसू होतं. अजितदादाही खूश असल्याचं दिसून आलं. त्याचवेळी बाजूला असलेल्या एकनाथ शिंदे यांचा चेहरा मात्र पडल्याचं दिसत होतं. शिंदेंच्या बॉडी लँग्वेजवरून ते नाराज असल्याचं दिसून येत आहे. दिल्लीतील ही बैठक सुरू होण्यापूर्वी येथे आणखी एक बैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांशी जवळपास दीड तास चर्चा केली. दरम्यान, एकनाथ शिंदे हे दिल्लीत आले आणि त्यांनी थेट अमित शाहांची भेट घेतली.
या बैठकीनंतर अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस रात्री 3 वाजता मुंबईत दाखल झाले. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली. आज आमची पहिली बैठक झाली. उद्या (आज शुक्रवारी) पुन्हा बैठक होईल. या बैठकीत महायुतीचा मुख्यमंत्री कोण यावर चर्चा होईल. तसेच मंत्रिमंडळावरही चर्चा होईल. उद्या मुंबईत बैठक होईल. आमची बैठक सकारात्मक झाली. अमित शाह आणि जे.पी.नड्डांसोबत बैठक झाली. या बैठकीला आम्ही तिघेही उपस्थितीत होतो. आजच्या बैठकीत सरकार स्थापनेवर चर्चा झाली आहे. आमच्यात समन्वय आहे. मी कालच माझी भूमिका सांगितली, असे एकनाथ शिंदे म्हणाले.