*पुणे-* पुण्यातील पिंपरी येथे अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. आर्थिक नुकसान झाल्याने एकाने कुऱ्हाडीने वार करून भर दिवसा एका व्यावसाईकाची हत्या केली आहे. यानंतर आरोपीने रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन थेट पोलिस ठाण्यात पोहोचला. त्याला पाहून पोलिस देखील हादरले. मी खून केला आहे असे म्हणत मला अटक करा असे आरोपीने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश सूरदास मोटवाणी (वय ४६, रा गोलार्ड चौक पिंपरी) असे खून झालेल्या व्यावसायीकाचे नाव आहे. या प्रकरणी त्याच्या पत्नीने पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तर राम गोपीचंद मनवानी (वय ४१, रा. गोलार्ड चौक, पिंपरी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली. राम मनवानी आणि महेश मोटवाणी या दोघांचेही कुटुंब पिंपरी कॅम्पातील गेलार्ड चौकात एकमेकांच्या शेजारी राहतात. राम मनवानी याची ॲल्युमिनियम फॉईलची फॅक्टरी होती. या फॅक्टरीमध्ये महेश मोटवाणी कामाला होता. महेशमुळे कंपनीत आर्थिक नुकसान झाले. तसेच त्याच्यामुळे मोठे नुकसान झाल्याचा आरोप मनवानीने केला होता. यातून दोघांमध्ये मोठा वाद झाला.
महेश हा एका ऑनलाइन कंपनीसाठी फूड डिलिव्हरी बॉयचे काम करत होता. तो मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास फूड डिलिव्हरीच्या कामासाठी जात होता. यावेळी राम मनवानी हा हातात कुऱ्हाड घेऊन त्याची वाट बघत गोलार्ड चौकात थांबला होता. महेश येताच त्याने त्याच्यावर कुऱ्हाडीने वार केले. यात महेश हा गंभीर जखमी झाला. यानंतर आरोपी महेश हा रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन थेट पिंपरी पोलिस ठाण्यात गेला. यावेळी त्याने मी खून करून आलोय, असे पोलिसांना सांगितले. त्याला पाहून पोलिस देखील हादरले. पोलिसांनी घटनास्थळी जात जखमी महेश मोटवाणी याला पिंपरी येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदन करून कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे. तर राम मनवानी याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.