महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून महायुतीचा झंझावात दिसत आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्या पराभवापासून एकंदर निकालावर भावना व्यक्त केल्या आहेत.
राज्यात विधानसभा निकाल हा अनपेक्षित लागला असून महायुतीने महाविकास आघाडीला नेस्तनाबूत केल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक मातब्बर नेत्यांना घरी बसावे लागले आहे. या निकालावर महायुतीचे तीन प्रमुख नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत जनतेचे आभार मानले आहे. त्यासोबतच विरोधी पक्षातील नेत्यांनीही पत्रकारपरिषदेतून या धक्कादायक निकालाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष अमित ठाकरे यांच्या पराभवावर आणि एकंदर विधानसभा निकालावर केवळ तीन शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले आहे की, अविश्वसनीय! तूर्तास ऐवढेच…
अमित ठाकरे यांचा पराभव
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांचा माहिम मतदारसंघात पराभव झाला आहे. या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महेश सावंत यांचा विजय झाला आहे. त्यांनी 1316 मताधिक्क्यांनी शिवसेना ठाकरे गटासाठी माहिमचा बाल्लेकिला राखला आहे. महेश सावंत यांना 50213 मते मिळाली तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांना 48897 मते मिळाली. अमित ठाकरे यांना 33062 इतकी मते मिळाली. अमित ठाकरे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
मनसेचे खाते रिकामे
मनसे पक्षाने या निवडणुकीमध्ये 135 उमेदवार निवडणुकींच्या रिंगणात उतरविले होते. मात्र त्यातील कोणताही उमेदवार विजय मिळवू शकला नाही. त्यामुळे 2009 नंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या मनसेचा एकही आमदार विधानसभेत नसणार आहे.
महायुतीचा झंझावात
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागत आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार राज्यात महायुतीचा झंझावात पाहायला मिळत आहे.महायुतीला तब्बल 231 जागा मिळाल्या आहेत. 133 जागांवर आघाडी मिळवत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलाअसून भाजपचे हे यश आजपर्यंतचे सर्वात मोठे यश ठरले आहे. 2014 मध्ये भाजपला 122 जागांवर विजय मिळाला होता. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने तब्बल 57 जागा आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाने 41 जागावर आघाडी मिळवली आहे. या दोन्ही पक्षांनी केलेली कामगिरीही प्रभावशाली आहे.
महाविकास आघाडीचा सपशेल पराभव
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी नेस्तनाबूत झाल्याचे पाहायला मिळत असून ठाकरे गट, कॉंग्रेस आणि शरद पवार गट या महत्वाच्या पक्षांना केवळ 45 जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यात कॉंग्रेसला 15 जागा, शिवसेना ठाकरे गट 20 जागांवर आघाडीवर आहे तर शरद पवार गट10 जागांवर आघाडीवर आहे. इतर घटक पक्षांना काही जागांवर आघाडी मिळाली आहे त्यांचा समावेश केल्यास मविआ 50 पर्यंत पोहचू शकते.