पुणे- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर झाले आहे.बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत होत आहे. दोन्ही परीक्षा नियोजित तारखांपेक्षा दहा दिवस अगोदर होणार आहेत.
राज्य मंडळाने बारावी व दहावीचे अंतरिम वेळापत्रक जाहीर केले होते. वेळापत्रकावर नोंदवण्यात आलेल्या हरकती व सूचनांचा विचार करून वेळापत्रक अंतिम करण्यात आले. बारावीला सरासरी १५ लाख तर दहावीला १६ लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत, असे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले.
बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत. दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ३ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सीबीएसईचे वेळापत्रक ८६ दिवस आधी केले जाहीर-
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावी आणि दहावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. दहावीची परीक्षा १८ मार्चपर्यंत आणि बारावीची परीक्षा ४ एप्रिलपर्यंत असेल. यंदा शाळांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांची यादी वेळेत भरल्याने प्रथमच परीक्षेच्या ८६ दिवस आधी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या सत्रात देशभरातून ४४ लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.