सावंतवाडी : आगामी विधानसभा निवडणुकीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळणार आहे.
तिसरी आघाडी म्हणून संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू आणि इतर नेते दौरे करताना दिसत आहेत. मनसे आणि वंचित कडून जोरदार तयारी सुरु आहे.
दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीत तीन-तीन पक्ष सहभागी असल्याने एकाच मतदारसंघात अनेकजण इच्छुक असल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे भाजपा आणि शिंदे गट शिवसेना यांची युती आहे. मात्र सिंधुदुर्गातील सावंतवाडी मतदारसंघात या युतीत मिठाचा खडा पडल्याचे पाहायला मिळत आहे.
विद्यमान आमदार दिपक केसरकर यांच्याविरोधात भाजपा स्थानिक नेते तथा सावंतवाडी मतदारसंघ विधानसभा प्रचार प्रमुख राजन तेली यांनी रणशिंग फुंकले आहे.राजन तेली हे भाजपाकडून इच्छुक असल्याने त्यांनी दिपक केसरकर यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. तेली यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी शक्ती प्रदर्शन करत सावंतवाडी मतदार संघातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.
या मेळाव्यात आपल्यावर पक्षातर्गत कारवाई झाली, तरी चालेल, मात्र आपण दिपक केसरकर यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका घेतली. तर तेली इतर पक्षात प्रवेश करणार का? याबाबत मात्र कमालीची गुप्तता ठेवली गेली आहे. राजन तेली म्हणाले, ‘ २०१४ मध्ये भाजपसाठी मी माझा बळी दिला. २०१९ मध्ये एबी फॉर्म काढून टाकला, पक्षाने जर मला एबी फॉर्म दिला असता तर त्याच वेळेला दीपक केसरकर यांचा पत्ता कट झाला असता. आम्ही किती अन्याय सहन करायचा? मी रस्त्यासाठी निधी आणला, नारळ दीपक केसरकर फोडतात. दिपक केसरकर महान कार्यकर्ते मुख्यमंत्र्यानंतर, त्यांचं नाव येईल. दरवेळेला मी केलं, मी केलं, आम्ही केलं असं कधी म्हणणार?’, असे म्हणत तेली यांनी केसरकर यांच्यावर निशाणा साधला आहे.