सावर्डेमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई; सहा जणांना घेतले ताब्यात; रत्नागिरी जिल्ह्यात उडाली खळबळ…

Spread the love

चिपळूण- रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे दहशतवादविरोधी पथकाने धाड टाकून ६ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये कर्नाटक येथील पाच जणांचा समावेश आहे. अतिरेकी संघटनांना पैसे पुरवल्याचा आरोप यातील एका संशयितांवर आहे. काल बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या कारवाईने रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

कर्नाटक राज्यातून चोरट्या मार्गाने आणि चोरट्या पद्धतीने दहा लाख रुपयांचे खैराचे लाकूड आणून ते सावर्डे येथील एका ठिकाणी बेकायदेशीररित्या साठवून ठेवल्या प्रकरणी सावर्डे येथील एका स्थानिकासह इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक संशयित आरोपीचा संबंध इसिस या दहशतवादी संस्थे सोबत काम करणाऱ्या एका व्यक्तीशी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. खैर झाडाच्या लाकडाच्या बेकायदेशीर विक्रीतून मिळालेला हा पैसा दहशतवादी कामासाठी वापरला जात असल्याची शक्यता असल्याने दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.

सावर्डे विभागात दोन दिवस दहशतवादविरोधी पथक तळ ठोकून होते. या पथकाने सावर्डे बाजारपेठेलगतच्या एका विभागातून संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत कर्नाटकमधील पाच जणांनाही चौकशीसाठी मुंबईला नेण्यात आले आहे. मंगळवारी दिवसभर या कारवाईत हे पथक गुंतले होते. त्यानंतर बुधवारी सावर्डे येथील तरुण हाती लागताच हे पथक मुंबईकडे रवाना झाले. मात्र, या पथकाने स्थानिक पोलिसांना या घटनेचा सुगावा लावून दिला नाही. त्यामुळे या प्रकाराविषयी स्थानिक पोलिसांना फारशी माहिती नाही. संबंधित स्थानिक तरुणाने मुंबई येथे हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला असून तेथेच त्याची कर्नाटकमधील पाच जणांशी ओळख झाली असावी, अशी चर्चा आहे. याविषयी सावर्डे पोलिसांकडे अधिकृतपणे कोणतीही माहिती उपलब्ध नसली, तरी संबंधित कारवाईला दुजोरा देण्यात येत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page