रत्नागिरी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. समाजातील शेवटच्या माणसापर्यंत काम कसे पोहोचेल, यासाठीच मिळालेल्या संधीचा उपयोग करीत आहे. म्हणूनच भविष्यातही सर्वसामान्य जनतेसाठी विकासाचे राजकारण अविरतपणे पुढे न्यायचे आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजापूर या रेल्वेस्टेशन परिसराच्या सुशोभिकरण कामाचे आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले. रत्नागिरी रेल्वेस्थानकावर झालेल्या मुख्य सोहळ्यात फित कापून, कोनशिला अनावरण करुन हे लोकार्पण करण्यात आले. तसेच चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजापूर या रेल्वेस्थानकाच्या सुशोभिकरणाचे दूरदृश्यप्रणालीद्वारे लोकार्पण झाले. या प्रसंगी माजी आमदार बाळ माने, राजेश सावंत, राहुल पंडित, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता मिलींद कुलकर्णी, कोकण रेल्वेचे प्रादेशिक व्यवस्थापक शैलेंद्र बापट, तहसिलदार राजाराम म्हात्रे आदी उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण म्हणाले, कोकणवासियांचे एक वेगळे नाते कोकण रेल्वेशी आहे. रेल्वेने प्रवास करताना एक वेगळे आकर्षण आहे. सकारात्मक विचार केल्यानंतर सकारात्मक दिशेकडे जाता येते. याचदृष्टीने समाजातील शेवटच्या माणसापर्यंत काम कसे पोहोचेल यासाठी मिळालेल्या संधीचा उपयोग करीत आहे. विमानतळाप्रमाणे रेल्वेस्थानक परिसराचे रुपडं बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. टप्प्याटप्प्याने ही कामे सुरु झाली, पूर्णही झाली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कोकणाला न्याय देण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून महामंडळ निर्मितीचा निर्णय झाला. यातून पर्यटनदृष्ट्या कोकणला पुढे नेण्याचा सर्वांचा प्रयत्न आहे. जयगड पोर्टला येणाऱ्या काळात वेगळे रुप मिळालेले असेल. इथले स्थलांतरण थांबले पाहिजे. त्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे व भविष्याचे नियोजन ठेवलेले आहे. सर्व रेल्वे स्थानकांचे सुशोभिकरण करणे, त्यातून पर्यटनाच्या येणाऱ्या संधी पूर्ण करणे, यावर भर देण्यात येत आहे.
पालकमंत्री श्री. सामंत यावेळी म्हणाले, जिल्ह्यातील रेल्वेस्थानक परिसराचे सुशोभिकरण करुन, कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांची स्मृती जागविण्याचे काम केले आहे. कोकणातील लोकप्रतिनिधी असेल तर, कायापालट कसा होतो हे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी आज दाखवून दिले आहे. कायापालट करण्याची जबाबदारी घेवून, वेळेआधी कामे पूर्ण केली आहेत. कोकण रेल्वेसाठी प्रा. दंडवते, बॅरिस्टर नाथ पै, जॉर्ज फर्नांडिस यांनी दिलेले योगदान महत्वाचे आहे. शिरीष जैतपाल या बांधकाम व्यावसायिकाच्या संकल्पनेतून रेल्वेस्थानक बांधण्यात आले होते.
रत्नागिरी रेल्वेस्टेशन नुतनीकरणासाठी एमआयडीसीकडून ३८ कोटी ९८ लाख
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, रेल्वे स्थानक सुशोभिकरणसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निर्णय घेतला. त्याच धर्तीवर राज्यातील एस. टी बसस्थानके बांधण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला. एमआयडीसीने कोकण रेल्वेबरोबरही सामंजस्य करार केला आहे. त्यासाठी ३८ कोटी ९८ लाख रुपये दिले आहेत. यामधून बटरफ्लाय पध्दतीचे निवारा प्लॅटफॉर्म, प्लॅटफॉर्मची दुरुस्ती व मजबुतीकरण, विद्युतीकरण, परिसरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण, स्थानकामधील इतर इमारतीचे नुतनीकरण, प्रसाधन गृहाचे अद्यायावतीकरण व अतिरिक्त प्रसाधनगृह बांधणे, फूट ओव्हर ब्रीजचे बांधकाम आणि रेल्वेस्थानक इमारतीचे रंगकाम आदी कामे करण्यात येणार आहेत.
११ हजार ५०० रिक्षावाल्यांसाठी विम्याचे दोन हजार सिंधुरत्नमधून..
११ हजार ५०० रिक्षावाल्यांसाठी दोन हजार विम्याच्या रक्कमेसाठी सिंधुरत्नमधून भरण्याचा निर्णय घेतल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. त्याचबरोबर आंबा बागायतदारांच्या १०० पिकअप व्हॅनसाठी ३ लाख ५० हजार रुपये कमी करण्याचा निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आणि सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलनाने करण्यात आला. सुरुवात राज्यगीतांने तर, राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.