कायद्याच्या शिक्षणाबरोबर शिवशिक्षण घ्या
चिपळूण : छ्त्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक धगधगते अग्नि कुंड आहे. आचार, विचार, पराक्रमाचा नियोजन बध्द सार आणि जगातील सर्वोत्कृष्ट गुणांची खाणं म्हणजे आपले शिवराय.
शिवजयंती सोहळ्यात सर्व एकरंगी झालो आहोत. कारण हा रंग म्हणजेच शिवप्रेरणा आहे. त्यांचे विचार आत्मसात करून कायद्याचे शिक्षण घेताना शिवशिक्षण सुध्दा घेऊ या असे सूचक उदगार सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रीती बोंद्रे यांनी काढले.
खेड सिद्धयोग विधी महाविद्यालयामध्ये शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी त्या बोलत होत्या . प्रथम दीप प्रज्वलन प्राचार्य प्रीती बोंद्रे यांनी केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस योगिता डेंटल कॉलेजच्या डीन वर्षा जाधव यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर लॉ कॉलेजच्या प्राचार्य प्रीती बोंद्रे यांनी डीन वर्षा जाधव यांचे स्वागत केले. शिवजयंती सोहळ्याला अनेक मान्यवर सुद्धा उपस्थित होते .या कार्यक्रमात पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवरायांचा शौर्याचा इतिहास प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात नवीन दिशा आणि ऊर्जा देणारा आहे . शिवरायांच्या जीवन प्रवासामधील अनेक महत्त्वाच्या घटना आणि प्रसंग सूचित करतात की, प्रत्येक व्यक्तीकडे सहनशीलता, संयम, उत्कृष्ट नियोजन, दूरदृष्टी आणि दुसऱ्याचा आदर करता येणारी भावना असेल तर निश्चितच यशाचे शिखर तो गाठू शकतो. आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक निष्ठावंत माणसे जोडली. जी माणसे अठरापगड जातीमधील असताना सुद्धा स्वराज्याच्या कामी त्यांनी आपले बलिदान दिले. यावरून छत्रपतींची कार्यप्रणाली कशी होती, याचा अंदाज येतो. फक्त शिवजयंती करून त्या दिवसापूरते गोडवे न गाता हा जो एकची रंग आहे, तो छत्रपतींच्या नावाचा एकची रंग आहे. तो कायम आपल्या जीवनात उतरवला पाहिजे . आपल्या कृतीतून आणि आचरणातून तो नेहमी दिसला पाहिजे. सिद्धयोग विधी महाविद्यालयातील प्रथम वर्ष व द्वितीय वर्षीय विद्यार्थ्यांनी मिळून साजरी केलेल्या या शिवजयंती सोहळ्यामध्ये ज्यांनी छत्रपतींची भूमिका साकारली आणि त्यांचा पोषाख धारण केला त्यांनी सुद्धा हा परिवेश आपल्या आयुष्यामध्ये कसा बदल घडवेल आणि आपले आयुष्य कसे आदर्शवत होईल याचा विचार मनात ठेवला पाहिजे, असे त्यांनी बोलताना सांगितले. शिवविचार हे धगधगते अग्नि कुंड आहे. या अग्नि कुंडाचा दरारा इतका मोठा होता की, आजही छत्रपतींचे नाव उच्चारताच मनात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. आता फक्त शिवजयंती करून न थांबता सर्व मिळून शिवचरित्र स्वाध्यायमाला सुरू केली तर निश्चितच कायद्याच्या शिक्षणा बरोबरच शिवशिक्षण सुद्धा मिळेल. यातूनच तुमचा व्यक्तिमत्व विकास घडेल, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्याना दिला. या शिवजयंती सोहळ्यात प्रथम आणि द्वितीय वर्षी विद्यार्थ्यांनी अनेक कलाविष्कार दाखवणारे कार्यक्रम साजरे केले. यावेळी शिवरायांचा पाळणा, पोवाडा, नृत्य, नाटिका आणि गायन यातून विद्यार्थ्यांनी शिवरायांना मानवंदना दिली. पोवाडा गायनाने शिवजयंती सोहळ्याचे वातावरण शिवमय करून टाकले. या सोहळ्यास सर्व सिद्धयोग विधी कॉलेजचे विद्यार्थी, डेंटल कॉलेजचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्त खवणेकर तर आभार श्रेया कडू हिने मानले.
जाहिरात :