मुंबई- भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड हे पुन्हा एकदा शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी शरद पवार यांची भेट घेतली. पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पिचड पितापुत्र आणि पवार यांच्या अर्धा तास चर्चा झाली. अहमदनगर जिल्ह्यात हा भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.
विधानसभा निवडणूक जवळ आल्याने अनेक राजकीय नेते मंडळी इतर पक्षात प्रवेश करत असल्याचे दिसून येत आहे. आपापल्या मतदारसंघात असलेले सोयीचे राजकारण आणि तिकीट मिळण्याची शक्यता, यावरही पक्षप्रवेश सुरू आहेत. त्यातच अहमदनगर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी शरद पवार यांची भेट घेतली. सध्या पिचड कुटुंब हे भाजपमध्ये असले तरी ते लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून तुतारी हातात घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
मधुकर पिचड यांनी शरद पवार यांची भेट घेण्याची पहिली वेळ नाही. याआधी देखील त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. 2019 च्या निवडणुकीत वैभव पिचड यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. यावेळी राष्ट्रवादीचे किरण लमहाटे यांनी वैभव पिचड यांचा पराभव केला होता. मात्र आता वैभव पिचड यांचा शरद पवार गटात प्रवेश झाल्यास अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.