भारतीय जेम्स आणि ज्वेलरी रत्नागिरी कॅम्पस कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन,५० चे ५०० प्रशिक्षणार्थी करण्याचा प्रयत्न करावा – पालकमंत्री उदय सामंत…

Spread the love

रत्नागिरी :- येथील विठ्ठल मंदिराजवळील संतोष विश्वनाथ खेडेकर ज्वेलर्सच्या पहिल्या मजल्यावर भारतीय जेम्स आणि ज्वेलरी संस्था रत्नागिरी कॅम्पस कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज फित कापून करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी ५० ही संख्या ५०० पर्यंत करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन पालकमंत्री श्री. सामंत यांनी केले.

स्वयंवर कार्यालय येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमास जेम्स ॲण्ड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रोमोशन कौंसीलचे संचालक विपूल शाह, उपसंचालक किरीट भन्साळी, कार्यकारी संचालक सब्यासाची रे, रत्नागिरी जिल्हा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष संतोष खेडेकर, चिपळूण सराफ असोसिएशनचे अध्यक्ष विजयभाऊ ओसवाल, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दार्थ हिमंतसिंगका, देवाषिश विश्वास, उपव्यवस्थापक जितेंद्र घोलप, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश हणभर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, रत्नागिरीत सुरु होणारा हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. नवी मुंबईमधील जेम्स ॲण्ड ज्वेलरी पार्कमध्ये राज्याची आर्थिक व्यवस्था चालविण्याची ताकद आहे. त्यांचे अत्याधुनिक कंट्रोल रुम पाहिल्यानंतर आधुनिकता काय असते, हे समजून येते. विश्वातला पहिल्या क्रमांकाचा उद्योग हा आहे. याचे प्रशिक्षण केंद्र रत्नागिरीत सुरु होतंय, ही रोजगाराची नवी मोठी संधी आहे. ३५ हजारापासून अडीच लाख रुपयांपर्यंत पगाराची नोकरी या क्षेत्रात प्रशिक्षणानंतर मिळू शकते. राज्यातला जेम्स ज्वेलरीचा उद्योग गुजरातला गेला नाही, हे किरीट भन्साळी यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. प्रशिक्षणानंतर ५० जणांची बॅच मुंबईत नोकरीसाठी जाईल तेव्हा माझ्या आमदारकीचे, मंत्रीपदाचे सार्थक झालं, असे मी समजतो. असेही पालकमंत्री म्हणाले.

श्री. भन्साळी यांनी प्रशिक्षण, उद्योग आणि मिळणारी नोकरी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. स्वागत प्रास्ताविक सब्यासाची रे यांनी केले. शेवटी श्री. खेडेकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page