नवी दिल्ली : मूत्रमार्गाचा संसर्ग (UTIs), रक्ताचा संसर्ग, न्यूमोनिया आणि टायफॉइड यांसारख्या आजारांवरील उपचारासाठी देण्यात येणारे अँटीबायोटीक आता प्रतिसाद कमी झाला आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) एका रिपोर्टमधून ही माहिती उघड झाली आहे. या संदर्भातील वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.
ICMR रिपोर्टनुसार, टायफॉइड, न्यूमोनिया, रक्त आणि मुत्रमार्गाचा संसर्गावर उपचारासाठी वापरण्यात येणारे अँटीबायोटीक परिणामकारक ठरत नाहीत. कारण या आजारांसाठी कारणीभूत असलेले जीवाणू आता सामान्य प्रतिजैविकांना (जनरल अँटीबायोटीक) प्रतिसाद देत नाहीत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) अँटीमाइक्रोबियल रेझिस्टन्स सर्व्हिलन्स नेटवर्कने (AMRSN) आपला वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये न्यूमोनिया, सेप्सिस, श्वसन संसर्ग आणि अतिसार यांसारख्या संक्रमणांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सामान्य प्रतिजैविकांवर (Antibiotics) लक्ष केंद्रित केले आहे.
या अहवालात १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान सार्वजनिक आणि खासगी आरोग्य केंद्रांमधून एकूण ९९ हजार ४९२ नमुने गोळा करून त्याचे विश्लेषण करण्यात आले आहे. या अहवालात जीवाणूंविरूद्ध प्रतिजैविकांची (अँटीबायोटीक्सची) चाचणी घेण्यात आली. तेव्हा हे जीवाणू अँटीबायोटीक्स देऊन देखील पुन्हा मूत्र, रक्त आणि श्वसनमार्ग संसर्ग असलेल्या रुग्णाच्या शरीराच्या विविध भागांतील नमुन्यांमध्ये आढळून आल्याचे या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
या अहवालात रूग्णालयातील जनरल वॉर्ड आणि आयसीयूमधील (ICU) रूग्णांमध्ये E. coli या जीवाणूंचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाल्याचे आढळून आले. दरम्यान, या रूग्णांमध्ये सेफोटॅक्साईम (Cefotaxime), सेफ्टाझिडीम (Ceftazidime), सिप्रोफ्लोक्सासिन (Ciprofloxacin) आणि लेव्होफ्लॉक्सासिन (Levofloxacin) सारख्या अनेक प्रतिजैविकांनी (अँटीबायोटीक्सचा) या जीवाणूंविरूद्ध २० % पेक्षा कमी प्रभाव झाल्याचे आढळले असल्याचेही ICMR रिपोर्ट मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
अहवालात असे दिसून आले आहे की, अनेक अँटीबायोटीक्सची (प्रतिजैविक्सचा) परिणामकारकता कालांतराने कमी होत आहे. उदाहरणार्थ, पिपेरासिलिन/टाझोबॅक्टमची (Piperacillin-tazobactam) परिणामकारकता २०१७ मध्ये ५६.८ % होती. तर २०२३ मध्ये ती ४२.४ % वर घसरली आहे. अमिकासिन (Amikacin) आणि मेरोपेनेम (Meropenem) सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या अँटीबायोटीक्समुळेही संसर्गांशी प्रभावीपणे लढण्याची क्षमता कमी होत आहे. नकारात्मक जीवाणू (Gram-negative bacteria) हे शरीराच्या कोणत्याही भागात संसर्गास कारणीभूत ठरू शकतात. हे रक्त, मूत्र आणि फुफ्फुस यासारख्या महत्त्वाच्या शरीराच्या भागात सामान्यतः आढळणारे जंतू आहेत, असे देखील ICMR ने रिपोर्टमध्ये म्हटले आहे.