रत्नागिरी : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या प्रथम वर्धापन दिन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथे ऑनलाईन पार पडला. जिल्ह्यातील 8 महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्रांचे देखील उद्घाटन करण्यात आले. येथील महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत झालेल्या कार्यक्रमात 54 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई, जिल्हा कौशल्य विकासच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख, प्राचार्य शशिकांत कोतवडेकर, महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आर.डी. जानवेकर मुख्याधिकारी तुषार बाबर,अग्रणी जिल्हा व्यवस्थापक मुकुंद खांडेकर आदी उपस्थित होते.
कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक युवतींना व्हावा, या दृष्टीकोनातून राज्यामधील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करुन महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्रांमधून मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
लांजा येथील आर्टस्, कॉमर्स सायन्स कॉलेज आणि कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, सावर्डे येथील सह्याद्री पॉलिटेक्नीकल कॉलेज, खेडमधील आय.सी.एस. कॉलेज ऑफ ऑर्ट, कॉमर्स ॲण्ड सायन्स, चिपळूणमधील शरदचंद्रजी पवार इन्टिट्युट ऑफ अग्रीकल्चरल सायन्स, गुरुकुल कॉलेज आणि संजीवनी नर्सिंग कॉलेज, मोहिनी मुरारी मयेकर ऑर्ट ॲण्ड कॉमर्स कॉलेज चाफे अशा 8 महाविद्यालयांचा समावेश आहे.
काल रत्नागिरी येथील महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये प्रातानिधिक 15 लाभार्थ्यांना निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.