पिरंदवणे | फेब्रुवारी २३, २०२३.
संगमेश्वर तालुक्यातील खाडीपट्ट्यात असणाऱ्या पिरंदवणे येथे स्थित श्री ग्रामदुर्गा मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीचे औचित्य साधून शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी भाजपा नेते, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मा. बाळासाहेब माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मा. बाळासाहेब माने व उपस्थित मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत झाल्यानंतर शिवप्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून शिवरायांना वंदन करण्यात आले. यानंतर दीपप्रज्वलन झाले. श्री. योगेश मुळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी शिवछत्रपतींचा पराक्रम आणि विवेकवाद यांवर प्रकाशझोत टाकला.
उपस्थितांना संबोधित करताना भाजपा नेते श्री. बाळासाहेब माने म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य आहेत. जात-धर्म, पंथ-भाषा इतकेच नव्हे तर विविध राजकीय धारणा ज्यांच्यासमोर नतमस्तक होतात असे राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलण्यासाठी संधी मिळणे ही गोष्ट प्रत्येकासाठी सन्मानजनक आहे. छत्रपतींचे कार्य निश्चितच दैवी आहे. आपल्या मातेची इच्छा आणि पित्याच्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणणारे मातृ-पितृभक्त शिवाजीराजे, प्रजाहितदक्ष छत्रपती शिवाजी महाराज, स्त्रियांना न्याय आणि सन्मान देणारे शिवराय, अफजल खानाचा कोथळा काढणारे छत्रपती शिवाजी, बाजीप्रभू, तानाजी, मुरारबाजी या मित्रांसाठी मृत्युनंतर अश्रू गाळणारे शिवबा एक ना अनेक. प्रत्येक रुपात छत्रपती श्रेष्ठ ठरतात आणि प्रत्येक रुपात आपल्याला शिवाजीराजे आपल्या जवळचे वाटतात.”
“हे राजकीय व्यासपीठ नाही. शिवाय छत्रपतींची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. तरीही खंडप्राय भारत देशाचा कारभार करणारे आपले पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी शिवाजी महाराजांच्या मार्गावरून वाटचाल करत आहेत. शत्रूशी शत्रूसारखे तर मित्राशी मित्रासारखे वागून त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणातील आपल्या देशाचा प्रभाव वाढवला आहे. अनेक लोककल्याणकारी योजना कार्यान्वित करून जनसामान्यांना दिलासा दिला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक गोष्टी सुलभ करण्यासाठी त्यांचे सरकार कटिबद्ध आहे. शेवटी एवढेच सांगेन महाराज होते त्यामुळे आपण आपले अस्तित्त्व आजही ठळकपणे टिकवून आहोत. त्यामुळे पुढीलवर्षी छत्रपतींची जयंती येईपर्यंत गावाचा कायापालट करण्यासाठी कंबर कसा. आवश्यक त्या ठिकाणी मी नक्की सहकार्य करेन.”
यावेळी त्यांनी गावातील अनेक ओळखी आणि आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मुळे यांनी केले. यावेळी मानकरी श्री. अरविंद मुळे, सरपंच श्री. विश्वास घेवडे, उपसरपंच सौ. अंजली मेस्त्री, माजी उपसरपंच श्री. सदानंद लिंगायत, ज्येष्ठ गावकर श्री. जयराम घेवडे, गावकर श्री. गोविंद धोपट, मंदिर समितीचे विश्वस्त श्री. संजय गुरव, ग्रामसेविका सौ. माया गुरखे, सदस्य श्री. गजानन गुरव, श्री. प्रकाश गमरे, श्री. व सौ. ओक, श्री. दत्ताराम धोपट श्री. प्रभाकर घेवडे, श्री. परशुराम गुरव, श्री. दिलीप गुरव, श्री. प्रमोद जांभळे आदी मान्यवर उपस्थित होते.