*मुंबई-* अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या राज्यातील १ लाख २४ हजार ७१५ बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून सुमारे ६९ कोटी इतका निधी मजूर केला आहे. या नैसर्गिक आपत्तीत सुमारे ६८९२६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून शेतपिकांचे नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी शुक्रवारी राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून शासन निर्णय जारी केला.
*२३ कोटी ७२ लाख ९३ लाख इतका निधी शासनाने मंजूर केला आहे….*
राज्यातील नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि कोकण परिसरातील शेतकऱ्यांना जून २०२४ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीचा फटका सहन करावा लागला. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना राज्य शासनाने मदतीचा हात दिला आहे. राज्यातील या पाच विभागीय आयुक्तालय क्षेत्रात एकूण १२९९९.८७ इतके हेक्टर बाधित झाले असून ३५ हजार ४५८ बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे. या विभागासाठी २३ कोटी ७२ लाख ९३ लाख इतका निधी शासनाने मंजूर केला आहे.
छत्रपती संभाजीनगरात २६०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून बाधित शेतकऱ्यांची संख्या ५०११ आहे. त्यांना ३५३.६० लाख निधी मंजूर झाला आहे. नाशिक विभागात २२८७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून ३७३६ शेतकरी बाधित झाले आहेत. नाशिकला ६९१.५० लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. पुणे विभागात १११६.८१ हेक्टर बाधित झाले असून ४०४८ शेतकरी बाधित झाले आहेत. पुण्यासाठी ३५३.६० लाख निधी मंजूर झाला आहे.
*सर्वाधिक फटका बसला नागपूरला…*
सर्वाधिक फटका नागपूर विभागाला बसला. ३८३७.९८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून ८६८५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना ८०१. ०६ लक्ष निधी मंजूर झाला आहे. त्याखालोखाल कोकण विभागात ३१५७. १५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक १३,७१५ इतकी आहे. कोकणाला ३११.५७ लक्ष इतका निधी मंजूर झाला आहे.