भंडारा- एसटी ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेची ७१ वी सभा ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी भंडाऱ्यात आयोजित केली होती. ही सभा एसटी कामगार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उधळून लावली. सभेत खुर्च्या तोडण्यात आल्या तसेच पोलिसांवरही खुर्च्या फेकण्यात आल्या, धक्काबुक्की झाली. तसेच अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. सदावर्ते यांच्या समर्थकांनी भंडारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
वार्षिक विशेषांकावर सत्ताधाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्रीराम यांच्यासह नथुराम गोडसे यांचाही फोटो लावल्याचा मुद्दा या सभेत विरोधकांनी पुढे करत आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. या वेळी सदावर्ते समर्थक आणि विरोधकांमधील वाद विकोपाला गेला. वाद वाढल्यावर एकमेकांना धक्काबुक्की करत खुर्च्यांची तोडफोड करून फेकल्या. यातील काही खुर्च्या पोलिसांनाही फेकून मारल्या. एसटी कामगार कृती समितीने सभेतून बाहेर पडत लगतच्या दुसऱ्या सभागृहात वार्षिक सभा आटोपली. दरम्यान, सदावर्ते गटाचे नितीन शिंदे म्हणाले, सोन्याची अंडी देणारी बँक अशी काँग्रेसवाल्यांची धारणा होती. त्यामुळेच या सभेत त्यांनी राडा केला आहे.
सदावर्ते यांनी 35 लाख लुटले : संदीप शिंदे…
एसटी कामगार कृती संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले, जिथे सदावर्ते पती-पत्नी आहेत तिथे निश्चितपणे राडा आलाच. सदावर्ते यांनी एसटीच्या बाहेरचे सभासद बनवण्याचा कुटिल डाव रचला आहे. एसटीच्या बाहेरील सभासद बनवल्यास बँक बुडण्याचा धोका आहे. सदावर्ते हे स्वतः वकील असून त्यांनी ३५ लाख लुटले आहेत, असा आरोप शिंदेंनी केला.