मंडणगड (प्रतिनिधी)- येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव होते. यावेळी उपप्राचार्य डॉ.वाल्मिक परहर, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. विष्णु जायभाये, रा.से. यो. कार्यक्रमाधिकारी डॉ. शामराव वाघमारे, डॉ. महेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृषणंन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी कु. ऋणाली सागवेकर हिने उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले.
राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागातील स्वयंसेवकांनी पूर्ण दिवसाचे महाविद्यालयीन कामकाज चालविले. प्राचार्य म्हणून कु. सानिका महाडीक हिने तर उपप्राचार्य म्हणून रौनक मर्चंडे याने काम पाहिले. यावेळी आदर्श शिक्षक म्हणून वरिष्ठ विभागातून कु. आर्या कदम(कला), कु. साक्षी सुखदरे (वाणिज्य) व कु. रितू खामकर(विज्ञान) तर कनिष्ठ विभागातून सुनिल भोसले (वाणिज्य) व कु. आहाना मुंगरुस्कर (विज्ञान) यांची निवड करून मा. प्राचार्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी कनिष्ठ विभागातील प्रा. महादेव वाघ, तर वरिष्ठ विभागातील डॉ. अशोक साळुंखे, डॉ. शैलेश भैसारे व प्रा. प्रितेश जोशी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी कु. अक्सा माखजनकर, प्रणव केंद्रे, वंचिता शिगवण, सोहम सोमण या विद्यार्थी-शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच परिक्षकांच्या वतीने डॉ. अशोक साळुंखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना पुष्पगुच्छ देऊन विद्याथ्र्यांच्या वतीने शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त करण्यात आला. यानंतर कु. सानिका महाडीक हिने प्राचार्य म्हणून आपले मनोगत व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात सांगितले की, समाजाच्या सर्वांगीण विकासात शिक्षकांचे योगदान खूपच मोठे असते. माझ्या व्यक्तिगत जीवनावर मला शिकविणा-या शिक्षकांचा खूप मोठा प्रभाव आहे. कारण त्यांच्याकडून विद्यार्थी दशेत ज्ञानाचा मोठा खजिना मला प्राप्त झाला आहे. त्यामुळे माइया मनात आजही त्यांच्याप्रती आदरभाव कायम आहे. दुर्देवाने आजचे विद्यार्थी विद्यार्थी नव्हे, तर केवळ परिक्षार्थी बनले आहेत. आपल्या जीवनात आपण आपल्या शिक्षकांचे किती आदर्श आत्मसात करतो हे खूप महत्वाचे असते. ज्या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकांना भेटून नतमस्तक होतो व त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करतो, तो दिवस शिक्षकांसाठी ख-या अर्थाने शिक्षक दिन असतो. आपले सर्व शिक्षक समुपदेशक म्हणूनही आपल्या विद्याथ्र्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात. त्याचाही आपण लाभ घेतला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक, विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. साक्षी सुखदरे हिने तर कु. गायत्री वाघ हिने उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व एन. एस. एस. गटप्रमुख, डॉ. विष्णु जायभाये, एन. एस. एस. कार्यक्रमाधिकारी डॉ. शामराव वाघमारे, डॉ. महेश कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.