रत्नागिरी- सध्या रत्नागिरीत भाजपा महिला मोर्चा रत्नागिरी (द.) व दि यश फाऊंडेशन संस्था रत्नागिरी यांच्यावतीने रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक जि. प. गटात श्रावण मासानिमित्त मंगळागौरी स्पर्धांचे आयोजन करून माता-भगिनींचे संमेलन घडवण्यात येत आहे. यामध्ये रत्नागिरी शहरात मंगळागौरी स्पर्धांच्या दिमाखदार सोहळ्याला भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ उपस्थित होत्या.
मंचावर उपस्थित होत त्यांनी रत्नागिरीतील तमाम नारीशक्तीला वंदन करत भारतमातेचा जयघोष केला. भाजपा नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना तिथूनच फोन करत त्यांचा शुभेच्छा संदेश महिलांना ऐकवला. यानंतर त्यांनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
रत्नागिरीतील माता-भगिनींनी देवाभाऊ आणि बाळाभाऊंच्या पाठीशी ठामपणे उभे रहा..
त्या म्हणाल्या, “रत्नागिरीतील माता-भगिनींनी देवाभाऊ आणि बाळाभाऊंच्या पाठीशी ठामपणे उभे रहायला हवे. रत्नागिरी जिल्ह्यात बाळ माने फार पूर्वीपासून काम करत आहेत त्यामुळेच अनेक आवाहने आल्यानंतरही भाजपा कार्यकर्ते आपली शक्ती टिकवून आहेत. आता फक्त तुम्ही सर्वांनी पाठीशी उभे रहाण्याची गरज आहे.”
…इच्छूक उमेदवार म्हणून न बघता प्रबळ दावेदार म्हणूनच पहा…
याचे राजकीयदृष्ट्या विश्लेषण केल्यास आता बाळ माने यांना रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभेसाठी केवळ इच्छूक उमेदवार म्हणून न बघता प्रबळ दावेदार म्हणूनच पहावे लागणार आहे. त्यामुळे राज्यपातळीवर होणाऱ्या युती-आघाडीच्या राजकारणात रत्नागिरी विधानसभा चुरशीची आणि प्रतिष्ठेची ठरणार हे निश्चित. त्यामुळे चित्रा वाघ यांच्या विधानातील ‘बीटविन द लाईन्स’बाबत राजकीय विश्लेषकांना अधिक चर्चा करण्यास वाव मिळाला आहे.