मुंबई- ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसल्यामुळे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गणेश उत्सवासाठी गावाकडे निघालेल्या गणेशभक्तांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे त्यांचा हा संप कितपत योग्य आहे? असा सवाल त्यांनी यासंबंधी उपस्थित केला आहे.
राज्यभरात येत्या शनिवारी गणरायाचे आगमण होत आहे. यामुळे गणेशभक्तांचे पाय आपापल्या गावाकडे वळले आहेत. यासाठी ते प्राधान्याने आवडत्या लालपरीला म्हणजे एसटी सेवेला प्राधान्य देतात. पण एसटी कर्मचाऱ्यांनी आजपासून बंद पुकारल्यामुळे त्यांची मोठी गैरसोय झाली आहे. सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी तत्काळ पाऊले उचलली. पण अद्याप संप मागे घेण्यात आला नाही.
मंत्री उदय सामंत यांनीही या प्रकरणी मंगळवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यांनी त्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले. पण त्यात कोणताही तोडगा निघाला नाही. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सामंत यांनी या संपावर तीव्र नाराजी व्यक्त केली. उदय सामंत म्हणाले, सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यात त्यांना संप मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले. सरकार त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक आहे. त्यामुळे त्यांनी गणेशभक्ताची गैरसोय टाळण्यासाठी संप मागे घ्यावा. सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर यापूर्वीही सकारात्मक होते व भविष्यातही सरकारात्मक राहील. त्यांच्यावर अन्याय होऊ नये हीच आमची भूमिका आहे.
उदय सामंत म्हणाले, सरकारने एसटी महामंडळाविषयी वेगवेगळे निर्णय घेतले. यात महिलांना अर्धे तिकीट, 75 वर्षांहून अधिक वयाच्या वृद्धांना मोफत प्रवास आदी योजनांचा समावेश आहे. सरकारने यातील डिफरन्स देण्यास सुरुवात केली आहे. सरकारला एसटी महामंडळाचे नुकसान भरून काढण्यात थोडेफार यश आले आहे. महामंडळ पूर्णतः नफ्यात आल्याचा दावा मी करत नाही. पण या योजनांमुळे शासनाकडून एसटी महामंडळाला बऱ्यापैकी निधी प्राप्त होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.
गणेशोत्सवात संप कितपत योग्य?…
मंत्री उदय सामंत म्हणाले, परिवहन विभाग स्वतः मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यांच्या सूचनेनुसार मी एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. अनेक वेळा 4 वर्षापूर्वीच्या संपातही माझ्या सारख्याच कार्यकर्त्याने मध्यस्थीची भूमिका घेतली होती. आजदेखील तशीच भूमिका घेण्याचा मी प्रयत्न केला. पण मला एक गोष्ट समजत नाही. गणपती उत्सव राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळे या काळात असे आंदोलन होणे कितपत योग्य आहे याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.
कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी…
मी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागण्यांविषयी उद्याच्या बैठकीत थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला. सरकार त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक असल्यामुळे या प्रकरमी निश्चितच एखादा निर्णय होईल. आमचे सहकारी आमदार सदाभाऊ खोत किंवा आमदार गोपीचंद पडळकर त्यांच्यासोबतही मी चर्चा करेल. गणेशोत्सवात कोणत्याही नागरिकाला प्रवासात त्रात होणार नाही याची खबरदारी घेण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असे सामंत म्हणाले.