उक्ताड बेटावरील गाळ काढण्याच्या वादावर तोडगाप्रांत कार्यालयात बैठक ; ग्रामस्थांना आवश्यक रस्ता
चिपळूण : चिपळूण उक्ताड बेटावरील गाळ काढण्यावरून निर्माण झालेल्या वादात सामंजस्याने तोडगा काढण्यात आला आहे. उक्ताड बेटावरील गाळ काढला जाईल. त्याबरोबर ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी आवश्यक रस्ताही तेथे ठेवण्याची ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली.त्यामुळे ग्रामस्थांनी दोन पावले मागे येण्याची भूमिका घेतली. वाशिष्ठी नदीपात्रात उक्ताड बेटाजनीकचा गाळ काढण्यास ग्रामस्थांनी विरोध केला होता. त्यावर मंगळवारी प्रांत कार्यालयात आमदार शेखर निकमांच्या उपस्थितीत बैठक झाली. आमदार व प्रांताधिकाऱ्यांनी ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर तोडगा निघाला. गोवळकोट धक्क्यासह उर्वरित ठिकाणचा गाळ उपसा सुरू आहे.
नदीपात्रातील गाळ उपसा करणाऱ्या काही भागांचे रेखांकन पूर्णत्वास गेले आहे. दरम्यान, विरोधाच्या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम, प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत बचाव समिती सदस्य, माजी नगराध्यक्षा व ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक झाली. महापुरानंतर सर्वच स्तरातून गाळ काढण्याची मागणी आहे. अशातच बेटानजीक शासकीय जागेतील गाळ काढू नका, अशी मागणी चुकीची असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुलावर जाणे-येणेसाठीचा रस्ता कायम ठेवला जाईल. काही प्रमाणात रस्त्याच्या ठिकाणचा गाळ काढला जाईल. पुराचे पाणी अडले जाणार नाही याचीही दक्षता घेतली जाईल, असे सांगण्यात आले. गतवर्षापासून पूरमुक्त चिपळूण शहरासाठी पुढाकार घेतलेल्या नाम फाउंडेशनने यावर्षी वाशिष्ठी नदीतील पहिल्या टप्प्यातील गाळ उपशाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानुसार यंत्रसामुग्री लावून चार ठिकाणी गाळ उपसाही सुरू केला; मात्र गेल्या काही दिवसांपासून उक्ताड बेटावरील गाळ उपसा करण्यास स्थानिकांचा विरोध होता. त्या विरोधाच्या सुरात स्थानिक राजकीय नेतेमंडळींनीही सूर मिसळत फोनाफोनी सुरू केल्याने सोमवारी दुपारनंतर नाम फाउंडेशनने तेथील गाळ उपसा थांबवला होता. उक्ताड येथील बेट आणि तेथील गाळ उपसाचे काम गतवर्षापासून सुरू आहे. तेथेच लोकवस्ती असल्याने या बेटावरून तेथे जाण्यासाठी रॅम्प आणि रस्ता असल्याने तेथे नागरिकांचा विरोध वाढत आहे. अशातच काही राजकीय नेतेमंडळींनी नागरिकांच्या बाजूने नाम फाउंडेशनला फोनाफोनी करत असल्याने अखेर सोमवारी दुपारनंतर येथील गाळ उपसा थांबवण्यात आला. या वेळी बचाव समितीचे अरूण भोजने, किशोर रेडीज, उदय ओतारी, शहानवाज शहा, राजेश वाजे, माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, जलसंपदाचे विपुल खोत व जुवाड बेट येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
जाहिरात :