राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचा शनिवारी (31 ऑगस्ट) प्रकाशन सोहळा पार पडला. ‘जे पाहता रवी’ असं या पुस्तकाचं नाव आहे.
ठाणे : डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कला मंदिरात आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचं प्रकाशन झालं. यावेळी बोलताना त्यांनी “राजकारणात विरोधकांनी कितीही चिखलफेक केली तरी आपण आपलं काम करत राहिलं पाहिजं,” असं म्हणत विरोधकांना टोला लगावला.
यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, “तुम्हा सर्वांच्या साथीनेच आजवरची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक वाटचाल करू शकलो. तुम्हा सर्वांची साथ, तुमचा माझ्यावर असलेला विश्वास आणि प्रेम बघून नेहमीच भारावून जातो. आजही असाच अनुभव आला.”
या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, उद्योजक शंकरकाका भोईर, श्री गणेश मंदिर संस्थानाच्या अध्यक्षा अलकाताई मुतालिक, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम शिधये, पत्रकार श्रीकांत बोजेवार, पहिल्या आवृत्तीचे प्रकाशक सुरेश देशपांडे, मोरया प्रकाशनचे दिलीप महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
सामान्य कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्री…
‘जे पाहता रवी’ या पुस्तकात रवींद्र चव्हाण यांच्या जीवनाचा लेखाजोखा मांडण्यात आला. एक सामान्य कार्यकर्ता ते आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवासाचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला. तसंच या पुस्तकात शिक्षण, क्रीडा, राजकारण, सामाजिक, कला आदी क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या मंत्री रवींद्र चव्हाण यांची जीवनशैली आणि कार्यपद्धती यावर प्रकाश टाकण्यात आला असून, प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींनी आपले विचार या पुस्तकात मांडले आहेत.
मंत्रिपदाचा घमंड नाही…
या सोहळ्याला भाऊ तोरसेकर हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. “रवींद्र चव्हाण यांच्या गुणवत्तेवर विविध मान्यवरांच्या लेखांचा समावेश असलेल्या ‘जे पाहता रवी’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. रवींद्र चव्हाण यांना मंत्रिपदाचा घमंड नाही, ते एक साधे नेते असून त्यांचा गावात सन्मान होत आहे, ही अभिमानाची बाब आहे,” असं मत ज्येष्ठ पत्रकार व वक्ते भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केलं.