भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर आता जय शाह यांची आयसीसीचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली. ते 1 डिसेंबर 2024 पासून पदभार स्वीकारतील. आयसीसीचे सर्वोच्च पद भूषवणारे ते 5वे भारतीय ठरले आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची या पदासाठी चर्चा सुरू होती. मंगळवारी (27 ऑगस्ट) नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी इतर कोणी अर्ज न केल्यानं जय शाह यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला.
*कधी स्वीकारणार पदभार?*
35 वर्षीय जय शाह 1 डिसेंबरपासून पदभार स्वीकारतील. आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. जय शाह आता पुढील दोन वर्षे या पदावर राहणार आहेत. याआधी जगमोहन दालमिया 1997 ते 2000, शरद पवार 2010 ते 2012, एन श्रीनिवासन 2014 ते 2015 आणि शशांक मनोहर 2015 ते 2020 पर्यंत आयसीसीचे अध्यक्ष राहिले आहेत.
*जय शाह यांची प्रतिक्रिया-*
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जय शाह म्हणाले, “आयसीसीच्या अध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार. जागतिक स्तरावर क्रिकेटचा विकास करण्यासाठी मी काम करत राहीन. सध्या क्रिकेटच्या अनेक फॉरमॅटला प्रोत्साहन देणं महत्त्वाचं आहे. खेळात नवीन तंत्रज्ञान आणण्याचा मी प्रयत्न करेन. 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश हे एक मोठं यश आहे. आम्ही ऑलिम्पिकच्या माध्यमातून याला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देऊ आणि हा खेळ अधिक देशांमध्ये नेण्याचा प्रयत्न करू.”
*बिनविरोध निवड-*
आयसीसी अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची मंगळवारी शेवटची तारीख होती. या पदासाठी जय शाह वगळता कोणत्याही उमेदवारानं अर्ज केला नाही, त्यामुळं शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. शाह सध्या आयसीसीच्या वित्त आणि वाणिज्य उपसमितीचा भाग आहेत. जय शाह ऑक्टोबर 2019 पासून बीसीसीआय सचिव आणि जानेवारी 2021 पासून आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत.