उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर इथं भेट दिली. या भेटीच्या वेळी भाजपा आणि उबाठा गटात दिशा सालियन हत्या प्रकरणावरुन तुफान राडा झाला.
आदित्य ठाकरे थांबलेल्या हॉटेलबाहेर भाजपा आणि उबाठा गटात तुफान राडा
*छत्रपती संभाजीनगर-* : उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. मात्र आदित्य ठाकरे थांबलेल्या हॉटेल समोर भाजपा आणि उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये दिशा सालियन मृत्यू प्रकरमावरुन तुफान राडा झाला. पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. या घटनेनंतर पोलीस भाजपाची गुलाम असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. “भाजपा आंदोलन करणार हे आधीच माहिती असताना अगोदरचं प्रतिबंध का घालण्यात आला नाही. पोलीस सक्षम नाहीत, पोलीस अमच्याबाजुनं नसतील तर आम्ही आमच्या पद्धतीनं काय चुराडा करायचा ते करू,” असा इशारा अंबादास दानवे यांनी दिलाय.
*दिशा सालियन प्रकरणावरुन भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर-*
महिला अत्याचार विरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. महाविकास आघाडीचे राज्यभर निदर्शनं सुरू असताना भाजपानं देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, यासाठी आंदोलन केलं. दरम्यान रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावकडं जात असताना विमानतळ इथं आले असता, ठाकरे गटाचे कार्यकर्ते विमानतळाच्या बाहेर काळे झेंडे घेऊन उभे राहिले. हे प्रकरण भाजपाच्या चांगलं जिव्हारी लागलं. भाजपा कार्यकर्त्यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणी काय केलं, असा जाब विचारत आदित्य ठाकरे थांबलेल्या हॉटेल समोर निदर्शनं केली. याबाबत रविवार रात्री भाजपानं आंदोलनाचे नियोजन करत असतानाच ठाकरे गटानं देखील त्यांना विरोध करण्यासाठी आंदोलन उभारलं होतं. हॉटेल समोर ठाकरे गट आणि भाजपा दोन्हीही गट आमने-सामने येऊन त्यांनी आक्रमकपणे परस्परविरोधी घोषणाबाजी केली.
*पोलिसांनी केला लाठीचार्ज-*
महिला अत्याचार विरोधात ठाकरे गट आंदोलन करत आहे. त्यांच्या या आंदोलनाविरोधात भाजपा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. हॉटेलसमोर शिवसेना ठाकरे गट आणि भाजपा कार्यकर्ते परस्पर विरोधात आमनेसामने आले. महिला कार्यकर्त्या चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी यांनी भाजपाच्या गोटात शिरुन निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस आणि दोन्ही बाजुचे कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार देखील करावा लागला. यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलीस मुद्दाम भाजपाला साथ देत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून यावेळी करण्यात आला. तर “पोलीस भाजपाची गुलाम आहे. त्यांना जर आमची साथ द्यायची नसेल, तर आम्ही आमच्या पद्धतीनं धडा शिकवू,” असा इशारा यावेळी अंबादास दानवे यांनी दिला आहे.