चौथ्या श्रावण सोमवारी शिवलिंगाला वाहा ‘ही’ शिवामूठ; ‘अशी’ करा महादेवाची पूजा…

Spread the love

राज्यभरात श्रावण महिन्याचा उत्साह दिसून येतोय. यंदा श्रावण महिन्याची सुरुवात 05 ऑगस्टपासून झाली. या महिन्यात भगवान शिवची आराधना केली जाते. 26 ऑगस्टला राज्यात चौथा श्रावण सोमवार साजरा केला जात आहे. त्यानिमित्तानं कोणती शिवामूठ  महादेवाला वाहावी? वाचा सविस्तर….

*मुंबई:* श्रावणसरी अंगावर बरसु लागल्या की, बालकवी त्र्यंबक ठोमरे यांची “श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे” या कवितेची आठवण येते. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना (Shravan Month) मानला जातो. 2 सप्टेंबर रोजी श्रावण समाप्त होणार आहे. यावर्षीच्या श्रावण महिन्याचं पाच श्रावण सोमवार (Shravan Somwar) आले आहेत. 26 ऑगस्ट रोजी चौथा श्रावण सोमवार साजरा केला जात आहे. या दिवशी महादेवाला ‘जवस’ ही शिवामूठ Shravan Somwar Shivamuth वाहावी.

*चौथ्या सोमवारी कोणती शिवामूठ वाहावी?…*

श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी म्हणजेच 26 ऑगस्टला ‘जवस’ ही शिवामूठ आहे. या दिवशी तुम्ही जवस हे शिवलिंगाला वाहू शकता. यामुळं भगवान महादेव तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करतील.

*शिवामूठ करण्याची पद्धत-*

विवाहानंतर पहिली पाच वर्षे श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केलं जातं. श्रावण मासात येणाऱया चार सोमवारी चार प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केलं जातं. विवाहानंतरची पहिली पाच वर्षे क्रमवार हे व्रत केलं जातं. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी आणि क्रमानं तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि सातू (पाचवा सोमवार आल्यास त्या दिवशी) या धान्याच्या पाच मुठी देवावर वाहाव्यात.

*या पद्धतीनं करावी महादेवाची पूजा –*

सोमवारी सकाळी स्नान करून उपवास करून शिवाची पूजा करावी. सकाळच्या शुभ मुहूर्तावर शिव मंदिरात जावं किंवा घरातील शिवलिंगाची पूजा करावी. भगवान शिवाला गंगाजल किंवा दुधानं अभिषेक करावा. यानंतर भगवान शिवाला चंदन, बेलपत्र, अक्षता, पांढरी फुलं, मध, फळं, साखर, अगरबत्ती अर्पण करावी आणि सोमवारची कथा वाचावी. शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावून आरती करावी.

*भारतीय संस्कृतीची शिकवण :*

आधुनिक विचारसरणीच्या व्यक्तींना शिवामुठी व्रतामुळं अन्नधान्य नासाडीची चिंता सतावण्याची शक्यता आहे. मात्र, पूर्वी महिलांनी अर्पण केलेलं धान्य मंदिराच्या पुजाऱ्याला दिलं जायाचं. त्यामुळं देण्याचा आनंद अशा व्रतातून अनुभवता येतो. ज्ञान असो वा अन्न हे दिल्यानं ते वाढतं, ही आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. अगदी मूठभर असले तरी गृहिणींना आपण ते देऊ शकलो याचं समाधान वाटतं. ज्यांना मंदिरात जाता येत नाही, त्यांनी मूठभर धान्य बाजूला ठेवून शिवाचं स्मरण करावं. त्यात भर घालून गरजूंना ते अर्पण करावं.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page