
*कीव्ह-* युक्रेन आणि रशियाने आता शांततेचा मार्ग शोधला पाहिजे, भारत या दिशेने सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. युक्रेन आणि रशियाने आता युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटींच्या बाकावर यावे. शुक्रवारी कीव्हमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत झालेल्या भेटीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत शांततेसाठी सर्व प्रयत्नांसोबत आहे. झेलेन्स्की म्हणाले, जागतिक शांतता परिषदेत भारत अर्थपूर्ण भूमिका बजावत आहे, भविष्यातही भारताने त्यात महत्त्वाचे योगदान द्यावे अशी आमची इच्छा आहे.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी आंतरराष्ट्रीय नियम, सार्वभौमत्व मान्य केले. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यासोबतच्या नुकत्याच झालेल्या भेटीत चर्चा झालेल्या विषयांचीही पंतप्रधान मोदींनी झेलेन्स्की यांना माहिती दिली. पीएम मोदींनी झेलेन्स्की यांना वास्तविक परिस्थितीचे विश्लेषण करण्यास आणि राजनैतिक उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यास सांगितले. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पंतप्रधान मोदींचा युक्रेन दौरा ऐतिहासिक असल्याचे म्हटले आणि यामुळे या भागात शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल, असे सांगितले. पंतप्रधान मोदी शुक्रवारी सकाळी विशेष ट्रेनने कीव्हला पोहोचले. १९९१ मध्ये स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आल्यानंतर युक्रेनला भेट देणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.
युक्रेनला चार फिरती रुग्णालये भेट दिली…
भारताने युक्रेनला चार फिरती रुग्णालये ‘भीष्म’ भेट दिली आहेत. आरोग्य मैत्री प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेली ही फिरती रुग्णालये युद्ध किंवा इतर नैसर्गिक आपत्तींच्या काळात वापरली जाऊ शकतात. या फिरत्या रुग्णालयांतून एकावेळी २०० जखमींवर उपचार करता येतील.
भारत आणि युक्रेनदरम्यान ४ महत्त्वाचे करार…
भारत आणि युक्रेनमध्ये चार महत्त्वाच्या करारांवरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यापैकी, युक्रेनच्या विकास योजनांमध्ये भारताकडून मानव संसाधनाशी संबंधित सहकार्य सर्वात महत्त्वाचे आहे. कृषी, सांस्कृतिक सहकार्य आणि औषधी पुरवठ्यावरही करार करण्यात आले.