*मुंबई-* बदलापूर रेल्वे स्थानकावर मंगळवारी झालेले आंदोलन पूर्वनियोजित असल्याचा दावा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केला आहे. यासाठी त्यांनी आंदोलकांकडे असणारे छापील बॅनर्स तथा इतर काही सामग्रींचा दाखला दिला आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यानंतर सोमवारीच हे आंदोलन करण्याचा काही राजकीय पक्षांचा डाव होता. पण सोमवारी रक्षाबंधन असल्यामुळे ते आंदोलन मंगळवारी करण्यात आले, असे ते म्हणालेत. या दाव्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.
बदलापूरमधील एका नामांकित शाळेत 2 चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचे मंगळवारी तीव्र पडसाद उमटले. या घटनेविरोधात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. आंदोलकांचा एक गट घटना घडली त्या आदर्श शिक्षण संस्थेच्या परिसरात आंदोलन करत होता. तर दुसरा गट बदलापूर रेल्वेस्थानकात शिरून रेल्वे रोको करत होता. या आंदोलकांनी तब्बल 10 तास रेल्वे सेवा रोखून धरली. पोलिस व प्रशासनाने हे आंदोलन थांबवण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण ते फोल ठरले. अखेर पोलिसांनी 6 च्या सुमारास आंदोलकांवर सौम्य लाठीमार करून त्यांना पांगवले. त्यानंतर रेल्वे सेवा सुरुळीत झाली.
*रक्षाबंधनामुळे 1 दिवस उशिराने आंदोलन…*
या पार्श्वभूमीवर आता मंगळवारचे हे आंदोलन पूर्वनियोजित असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, आंदोलकांच्या हातात छापील बॅनर्स, व्हॉट्सअॅपवरील मेसेज व इतर काही संकेतांवरून हे आंदोलन पूर्वनियोजित होते हे स्पष्ट होते. या लैंगिक अत्याचाराप्रकरणी सोमवारी एफआयआर दाखल झाला. त्यानंतर त्याच दिवशी आंदोलन करण्याचा काही राजकीय पक्षांचा प्रयत्न होता. पण सोमवारी रक्षाबंधन असल्यामुळे हे आंदोलन मंगळवारी करण्यात आले.
*आंदोलकांकडील साधन सामग्रीने संशय…*
एक वरिष्ठ पोलिस अधिकारी याविषयी बोलताना म्हणाला की, आंदोलकांनी छापील फलक, तसेच इतर काही वस्तू आणल्या होत्या. त्यावरून ते या आंदोलनासाठी व्यवस्थित तयारी करून आले होते हे दिसून येते. विशेषतः त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या विरोधातही घोषणाबाजी केली. त्यावरूनही हे आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे स्पष्ट होते.
*व्हॉट्सअॅपवरून एकत्र जमण्याचे आवाहन…*
आंदोलकांनी या आंदोलनासाठी काही व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केले होते. या ग्रुपवरून नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनानुसार मंगळवारी सकाळी 6 वाजेपासूनच आंदोलक बदलापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर जमण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर सकाळी 10 च्या सुमारास रेल्वे सेवा पहिल्यांदा रोखण्यात आली. त्यानंतर तासाभराने 11 च्या सुमारास आदर्श शाळेबाहेर आंदोलकांचा जमाव जमला. त्यांनी शाळेत शिरून तोडफोड केली, असेही पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी सांगितले.
*नाईलाजाने करावा लागला लाठीमार…*
ठाण्याचे सहपोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी या प्रकरणी बोलताना दगडफेकीप्रकरणी आतापर्यंत डझनभर लोकांना अटक करण्यात आल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, आंदोलक बदलापूर रेल्वेस्थानकातून मागे हटण्यास तयार नव्हते. त्यामुळे पोलिसांनी सायंकाळी 6.10 च्या सुमारास नाईलाजाने सौम्य लाठीमार करून त्यांना पांगवण्यास सुरुवात केली. शाळा व बदलापूर रेल्वेस्थानकात झालेल्या दगडफेकीप्रकरणी पोलिसांनी 2 स्वतंत्र गुन्हे दाखल केलेत. या प्रकरणी आतापर्यंत डझनभर लोकांना अटक करण्यात आली आहे.
*रेल्वे पोलिसांनी 26 जणांना घेतले ताब्यात…*
दुसरीकडे, रेल्वे पोलिस आयुक्त रवींद्र सिसवे यांनी या रेल्वे वाहतुकीत अडथळा निर्माण करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. रेल्वे सेवेत अडथळा आणणाऱ्या आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 26 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आणखी काही लोकांवर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.