ठाणे : प्रतिनिधी ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिन्यांची कामे २१ ते २४ फेब्रुवारीदरम्यान करण्यात येणार असल्यामुळे या काळात शहरातील वेगवेगळ्या भागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. काही ठिकाणी १२ तास, तर एका भागात २४ ते ३६ तास पाणीपुरवठा बंद असेल. तसेच या शटडाऊननंतर पुढील दोन ते तीन दिवस कमी पाणीपुरवठा होणार असल्यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन ठाणे महापालिकेकडून करण्यात आले.
ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेची एक मुख्य जलवाहिनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एनएच-३च्या लगत आहे. या योजनेच्या जलवाहिनीला सहा वेगवेगळ्या ठिकाणी लागलेली गळती बंद करण्याचे काम केले जाणार आहे. या काळात महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून केवळ ५० टक्के पाणीपुरवठा होणार आहे. तसेच साकेत पुलावरील मुख्य जलवाहिनीवर व्हॅक्युम एअरव्हॉल्व्ह बसविणे, इंदिरानगरकडे नव्याने टाकण्यात आलेल्या ११६८ मिमी जलवाहिनीची तीनहात नाका येथे मुख्य जलवाहिनीशी जोडणी करणे, तसेच पाणीपुरवठ्यामधील दैनंदिन देखभाल व दुरुस्तीची अत्यंत आवश्यक कामे २१ ते २४ फेब्रुवारीदरम्यान केली जाणार आहेत. त्यामुळे ठाणे शहरात टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा केला जाणार आहे. २१ फेब्रुवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत १२ तास, २३ फेब्रुवारी रोजी रात्री ९ ते सकाळी ९ वाजेपर्यंत १२ तास आणि शुक्रवारी २४ फेब्रुवारी रोजी रात्री ९ ते सकाळी ९ असे एकूण ३६ तास घोडबंदर रोड, माजिवडा, बाळकुम, ब्रह्मांड, ढोकाळी, कोलशेत, मानपाडा, आझादनगर, पातलीपाडा, डोंगरीपाडा, वाघबीळ, विजयनगरी, कासारवडवली, ओवळा भाईंदरपाडा या भागांमध्ये पाणी बंद राहणार आहे.
२१ फेब्रुवारी, २२ फेब्रुवारी रोजी रात्री ९ ते सकाळी ९ या वेळेत गांधीनगर, सुरकरपाडा, उन्नती, सिद्धांचल, जेल, साकेत, ऋतूपार्क, रुस्तोमजी, कळवा, खारेगाव, आतकोनेश्वरनगर, रघुकुल, मुंब्र्याच्या काही भागाचा पाणीपुरवठा बंद असेल. तर २२, २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते रात्री ९ असे सुमारे ३६ तास सिद्धेश्वर, समतानगर, दोस्ती, आकृती, जॉन्सन ईटरनिटी या भागात पाणीपुरवठा होणार नाही. गुरुवारी सकाळी ९ ते शुक्रवार सकाळी ९ यावेळेत इंदिरानगर, लोकमान्यनगर, किसननगर, श्रीनगर, शांतीनगर, रामनगर, रूपादेवीपाडा, सावरकरनगर, डवलेनगर, परेरानगर, कैलासनगर, भटवाडी या भागांत पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, तसेच पुरेशी साठवणूक करावी, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले.
जाहिरात :