*रत्नागिरी, दि. 15 (जिमाका) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जन्मस्थळातील ग्रंथालयामध्ये संशोधन केंद्र सुरु करण्यात येईल. याठिकाणी लोकमान्य टिळक यांच्यावर संशोधन करण्यासाठी जगभरातून लोक येतील. या वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवतील, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.*
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जन्मस्थान नुतनीकरण कामाचे कोनशिला अनावरण करुन आणि फीत कापून लोकार्पण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, भैरी देवस्थानचे उपाध्यक्ष राजन जोशी, माजी नगरसेवक बिपीन बंदरकर, माजी नगरसेवक सुदेश मयेकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, आजचा दिवस महत्त्वाचा आहे. याची नोंद रत्नागिरीच्या इतिहासात घेतली जाणार आहे. आमदार असताना लोकमान्य टिळकांच्या मेघडंबरीसाठी आमदार फंडातून निधी दिला होता. मिशन म्हणून नुतनीकरणाचे काम राबवून ते वर्षभरात पूर्ण केले. अत्यंत सुंदर झाले आहे. हे स्मारक ऐतिहासिक वारसा जपणारे आहे. स्मारकाची, ग्रंथालयाची उत्तम वास्तू पहा. अभ्यासक पर्यटक यांच्यासाठी हे स्मारक उशिरापर्यंत उघडे ठेवले जाईल. याठिकाणी वाकींग ट्रॅक सुविधाही केली जाईल.
शहरातील रस्त्यांचे खड्डे देखील भरायला सुरुवात झाली आहे. सुज्ञ लोकांनी वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी. दोन महिन्यात रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम देखील पूर्ण होणार आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, आर्ट गॅलरी, थिबा पॅलेस थ्रिडी मल्टीमीडिया शो, प्राणीसंग्रहालय, तारांगण त्याचबरोबर शेतकऱ्यांची मुले इस्त्रो आणि नासा सारख्या संस्थांना भेट द्यायला दरवर्षी जातात. हा विकासही पाहणे आवश्यक आहे. एकाद्या येवू घातलेल्या प्रकल्पासाठी समर्थन समिती बनविणे देखील आवश्यक असते. देशाला भूषण वाटणारा डिफेन्सचा प्रकल्प रत्नागिरीत येतोय. त्याची घोषणा 8 दिवसात होईल, असेही पालकमंत्री म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. दीप प्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.