सोलापूर- कुटुंब, पक्ष फोडले हेच देवेंद्र फडणवीसांचे कर्तृत्व आहे का? असा हल्ला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच लोकसभेत लोकांनी हेच कर्तृत्व धुवून काढले. आता विधानसभेतही जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे. सोलापूरमध्ये आज शरद पवार गटाचा शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी महायुती सरकारला लक्ष केले आहे.
लोकसभेला लोकांनी कर्तृत्व धुवून काढले…
रोहित पवार म्हणाले, काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, इतिहासात कर्तृत्वाला स्थान असते, पण मला देवेंद्र फडणवीस यांचा इतिहास बघायचा आहे. त्यांचे कर्तृत्व नेमके काय? त्यांनी कुटुंब फोडले, पक्ष फोडले. आज राज्यातला शेतकरी आत्महत्या करतो आहे, तेव्हा ते शांत आहेत, राज्यात आज गुंडांचे राज्य आले आहे, पण ते शांत आहेत. त्यांच्या या भूमिकेला नेमके काय म्हणायचे?, हेच तुमचं कर्तृत्व आहे का? लोकसभेला लोकांनी तुमचं कर्तृत्व धुवून काढले, तसे या विधानसभेलाही लोक तुम्हाला धडा शिकवतील”, असे रोहित पवार म्हणाले.
…तर अजितदादांनी दिल्लीत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले असते…
रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. ”केंद्र सरकारने कांदा निर्यातीबाबत घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे पाच हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. मात्र, त्यावर राज्यातील नेते काहीही बोलत नाहीत. काही दिवसांपूर्वी अजित पवार म्हणाले की केंद्र सरकारने कांद्याबाबत घेतलेला निर्णय चुकीचा होता, पण खरं तर अजित पवार हे सत्तेत आहेत, ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना खरंच शेतकऱ्यांचा कळवळा असता, तर त्यांनी दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले असते”, अशी टीका त्यांनी अजित पवार यांच्यावर केली.
शरद पवार लोकांची आत्मा…
पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीकास्र सोडले आहे. ”लोकसभा निडवणुकीच्या काळात दिल्लीचे बादशहा महाराष्ट्रात आले होते. त्यावेळी ते शरद पवार यांच्याबाबत खूप काही बोलले. त्यांनी शरद पवार यांना भटकती आत्मा म्हणाले. मात्र लोकसभेच्या निकालात जनतेने दाखवून दिले आहे, की शरद पवार हे भटकती आत्मा नसून ते राज्यातील स्वाभिमानी आणि महाराष्ट्र धर्म ठिकवणाऱ्या लोकांची आत्मा आहे”, असे रोहित पवार म्हणाले.